वाचनालयाचे अनुदान रोखले

By Admin | Updated: November 19, 2015 22:45 IST2015-11-19T22:44:22+5:302015-11-19T22:45:29+5:30

ग्रंथालय संचालकांची कारवाई : मागितलेली माहिती वेळेत न दिल्याचा ठपका

Libraries have stopped grants | वाचनालयाचे अनुदान रोखले

वाचनालयाचे अनुदान रोखले

नाशिक : अर्जदारांनी माहितीच्या अधिकारानुसार मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत शासनाच्या ग्रंथालय विभागाने येथील सार्वजनिक वाचनालयाचे अनुदान रोखले आहे. सहायक ग्रंथालय संचालकांनी ही कारवाई केली असून, यामुळे सावानाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांतील वाद पुन्हा चर्चेत आले आहेत.
सावानाचे माजी कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बेणी, श्रीकृष्ण शिरोडे व हेमंत देवरे यांनी सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह तथा जनमाहिती अधिकारी मिलिंद जहागिरदार यांच्याकडे अग्निशमन यंत्रणेचे काम, सभासदांची यादी, जून ते आॅगस्ट २०१५ या कालावधीतील बैठकांचे इतिवृत्त आदि माहिती मागितली होती. राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाने चार प्रकरणांत आदेश पारित करून माहिती देण्याचे सावानाला बजावले होते; तथापि, जहागिरदार यांनी जनमाहिती अधिकारीपदाचा राजीनामा दिला असल्याने नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत माहिती देता येणार नाही, असे पत्र सावानाच्या सहायक माहिती अधिकाऱ्यांनी अर्जदारांना पाठवले होते; मात्र त्यानंतर कार्यकारी मंडळाच्या आठ बैठका होऊनही सदर नियुक्ती करण्यात आली नाही. प्रथम अपिलीय अधिकारी तथा सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी माहिती देण्याचा आदेश देऊनही माहिती दिली जात नव्हती. संस्थेच्या अध्यक्षांनी नवीन जनमाहिती अधिकारी नियुक्त होईपर्यंत जहागिरदार यांनीच काम पाहावे, असे पत्रही आॅक्टोबरमध्ये दिले होते; मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. अखेर बेणी यांनी चार महिन्यांनंतर नाशिक विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक अ. द. येवले यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याची दखल घेऊन येवले यांनी गेल्या ९ नोव्हेंबर रोजी सावानाला पत्र पाठवून माहिती देण्यात होत असलेली टाळाटाळ गंभीर व खेदजनक असल्याचे कळवले. याबाबतचा खुलासा करण्याचे तसेच येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत अर्जदारांना सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. सदर माहिती दिल्याचा व विलंबाच्या खुलाशाचा अहवाल सादर होईपर्यंत सावानाला कोणत्याही प्रकारचे अनुदान वितरित करण्यात येऊ नये, असा आदेश जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी यांना देण्यात आला असून, माहिती उपलब्ध करून न दिल्यास वाचनालयाच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीस कार्यकारी मंडळ जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: Libraries have stopped grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.