‘लेव्ही’ने शेतकऱ्यांची ‘टोटल लेव्हल’
By Admin | Updated: June 17, 2014 00:09 IST2014-06-16T23:48:25+5:302014-06-17T00:09:46+5:30
‘लेव्ही’ने शेतकऱ्यांची ‘टोटल लेव्हल’

‘लेव्ही’ने शेतकऱ्यांची ‘टोटल लेव्हल’
पिंपळगाव / लासलगाव : ‘लेव्ही’च्या प्रश्नावरून कधी माथाडी कामगारांकडून तर कधी व्यापाऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचा कारभार दोन वर्षांत तब्बल नऊ वेळा ठप्प झाला आहे. लिलाव प्रक्रिया बंद झाल्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले असून ‘लेव्ही’मुळे बळीराजाची ‘टोटल लेव्हल’ झाल्याचे म्हणजेच तो अक्षरश: भुईसपाट झाल्याचे चित्र आहे.
२००८ पर्यंत लेव्हीची कपात शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाच्या पैशातून केली जात असे. सदर पद्धतीस नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध करीत मुंबई उच्च न्यायलयात दाद मागितली. त्यावर न्यायलयाने लेव्हीची कपात शेतकऱ्यांच्या पैशातून न करता ती व्यापाऱ्यांनी द्यावी, असा निकाल दिला. त्यानुसार माथाडी कामगारांनी व्यापारीवर्गाकडे लेव्हीची मागणी केली. मात्र त्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला.
२००८ पासून आजवर ‘लेव्ही’चे सुमारे २३ कोटी रुपये थकलेले असल्याचा माथाडी कामगारांचा दावा आहे.
दरम्यान, २००८ पासून आजवर लेव्हीच्या दरात दोनवेळ वाढ करण्यात आली. तसे आदेशही जिल्हा निबंधकांनी बजावले. २००८ साली २२ टक्के लेव्ही कपात करण्यात येत असे. त्यानंतर सदर कपात ३४ टक्क्यांवर गेली. सध्या ४४ टक्के लेव्हीचा दर आहे.
अर्थात सदर दरवाढ व्यापारी वर्गांस मान्य नाही. जे कामगार व्यापाऱ्यांकडे काम करतात त्यांच्या लेव्हीची रक्कम व्यापाऱ्यांकडून भरली जाते. माथाडी कामगारांची नेमणूक बाजार समिती करीत असल्यामुळे त्यांच्या लेव्हीची रक्कम व्यापारी भरीत नाहीत, असे व्यापारी असोसिएशनचे म्हणणे आहे.