नाशिक : कोरोना निर्बंधामुळे मंदिरे उघडण्यास अद्यापही परवानगी देण्यात आलेली नसताना नाशिकमध्ये नवशा गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी विचारले असता यापुढे काळजी घेऊ, इतकेच उत्तर देऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिक बोलणे टाळले.
राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड हे तीन दिवसांपूर्वी नाशिमध्ये आले असता त्यांच्यासाठी नवशा गणपती मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले होते. यावेळी आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंदिरात आरती केली होती. सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर आव्हाड यांच्यासमवेत असलेल्या कार्यकर्त्यांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याने सध्या चर्चा होत आहे.
नाशिकमध्ये कोरेाना आढावा बैठकीसाठी आलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. सर्वसामान्य नागरिक आणि मंत्र्यांना वेगळा न्याय का? असे त्यांना विचारले असता त्यांनी यापुढे काळजी घेऊ एव्हढेच उत्तर दिले.