चला.. गमतीला चला.. बहुरूपी आला..
By Admin | Updated: October 21, 2016 23:48 IST2016-10-21T23:47:17+5:302016-10-21T23:48:40+5:30
ओझर : दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी करमणूक

चला.. गमतीला चला.. बहुरूपी आला..
सुदर्शन सारडा ओझर
एकेकाळी वर्षभर गावात फिरून ग्रामस्थांची करमणूक करणारा बहुरूपी हल्ली दिवाळीच्या दिवसांत येतात. ओझरच्या गल्लीबोळात घराबाहेर ओट्यावर बसून एखाद्याची फिरकी घेत गंमत करणारे बहुरूपी फिरत आहेत.
बीड, उस्मानाबाद या परिसरातील हे बहुरूपी नागरिकांचे मनोरंजन करीत असल्याने ते लहान मुलांचेही आकर्षण झाले आहेत. घराबाहेर ओट्यावर बसलेल्या ग्रामस्थांच्या घोळक्यात जाऊन पोलीस बनून आलेला बहुरूपी अंगणात बसलेल्या काकांना म्हणतो, ‘साहेब, तुमच्या नावाचं वॉरंट आणलं आहे.’ कसले वॉरंट असे विचारताच बहुरूपी म्हणतो, ‘गेल्या दिवाळीत तुम्ही तयार केलेल्या करंज्यामध्ये साखरच नव्हती अशी तुमच्या घरी येऊन गेलेल्या पाहुण्यांची तक्रार आहे.’ हे ऐेकून तसेच पोलीस बनून आलेल्या या बहुरूपी कलावंंताने घातलेले कपडे बघून हा बहुरूपी असल्याचे काका ओळखतात आणि त्याच्याच गमतीशीर भाषेत ते त्याच्याशी बोलू लागतात. आपल्या भागातील एका माणसाशी पोलीस हुज्जत घालत आहे हे बघून ज्यांनी या बहुरूपीला ओळखले नाही ते गंभीर होतात. बहुुरूपीने घातलेला वाद चांगलाच रंगत आणत असल्याने ज्यांनी त्याला ओळखले त्यांचे मनोरंजन होेते. गमतीशीर संवाद रंगात आल्यानंतर हा बहुरूपी पोलीस काकांना दंड आकारतो व ‘चला दहा रुपये काढा व प्रकरण मिटवून टाका’ असे म्हणतो. काकादेखील हसत हसत राजीखुशीने त्याला पैसे काढून देतात. मग अन्य उपस्थितांनाही कळते की हा मनोरंजन करणारा बहुरूपी आहे. हा प्रसंग बघायला आलेल्या गर्दीतून काही जण स्वखुशीने या बहुरूपीला आर्थिक मदत करतात. एकेकाळी गावागावांत लोकप्रिय ठरलेला बहुरूपी हा कलाप्रकार आता दुुर्मीळ होत चालला आहे. नवीन पिढीला हा प्रकार माहिती नसल्याने त्यांना बघून लहान मुले आधी घाबरतात. नंतर तेही या बहुरूपीबरोबरच्या गमतीशिर गप्पांमध्ये सहभागी होतात. ओझरच्या गल्लीबोळात गेल्या काही दिवसांपासून असे मनोरंजन सुरू आहे.