अभ्यास दौऱ्याकडे दहा संचालकांची ‘पाठ’

By Admin | Updated: October 10, 2015 23:33 IST2015-10-10T23:32:55+5:302015-10-10T23:33:37+5:30

जिल्हा बॅँक : न.पा., कृषी औद्योगिक संघ निवडणुकीची दिली कारणे

'Lessons of Ten Directors' to study tour | अभ्यास दौऱ्याकडे दहा संचालकांची ‘पाठ’

अभ्यास दौऱ्याकडे दहा संचालकांची ‘पाठ’

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा १३ व १४ आॅक्टोबर रोजी आयोजित अभ्यास दौऱ्याकडे निम्या संचालकांनी पाठ फिरविल्याचे वृत्त असून, या अभ्यास दौऱ्यात अध्यक्षांसह दहा संचालक सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे सहभागी न होणाऱ्या संचालकांमध्ये काही आजी-माजी आमदारांचा व बॅँकेच्या उपाध्यक्षांचा समावेश असल्याचे कळते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी तसेच सातारा जिल्हा बॅँकेने सचिवांच्या सेवा जिल्हा बॅँकेकडे वर्ग केल्याने सातारा जिल्हा बॅँकेची सहकारी संस्थांकडून शंभर टक्के वसुली होत असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाने १३ व १४ आॅक्टोबर रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा अभ्यास करण्यासाठी दौरा आयोजित केला आहे. सुरुवातीपासूनच हा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, जिल्हा बॅँकेच्या ग्रामीण भागातील शाखांमध्ये चोरी व लूटमारीचे सत्र सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बॅँकेच्या हा अभ्यास दौरा चांगलाच चर्चेत आहे. वास्तविक पाहता तेथील कामकाजाचा अभ्यास करून सचिवांच्या सेवा जिल्हा बॅँकेच्या कक्षेत कशा वर्ग कराव्यात, सहकारी संस्थाकडून वसुली कशी वाढवावी, यासह काही बारकाव्यांचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांचे म्हणणे आहे.
मात्र जिल्ह्णासह राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्हा बॅँकेच्या शाखांमध्ये वाढत्या चोऱ्या पाहता आधी घर सांभाळा मग अभ्यास करा, असा खासगीत सल्ला बॅँकेच्या काही आजी-माजी संचालकांनी दिला आहे. त्यातच बॅँकेच्या २१ पैकी १० संचालकांनी जवळपास या अभ्यास दौऱ्यासाठी नकार कळविला आहे. त्यात पाच संचालकांनी महाराष्ट्र कृषी औद्योगिक संघाच्या निवडणुकीचे कारण दिले असल्याचे तर उर्वरित संचालकांनी जिल्ह्णातील नगरपालिका निवडणुकांचे कारण दिल्याचे समजते. मात्र गेल्या तीन महिन्यांतील अध्यक्षांच्या कामकाजाविरोधातील नाराजीचा सूर आणि गेल्या महिन्यात मासिक बैठकीवर टाकलेल्या सत्ताधारी संचालकांचा बहिष्कार या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे पाठ फिरविणाऱ्या दहा संचालकांबाबत चर्चा आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 'Lessons of Ten Directors' to study tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.