नाशिक : भाजपाची स्थापना कधी झाली, भाजपाचे पहिले अध्यक्ष कोण ही पक्षाची बाराखडी आता पक्षातील नव्या-जुन्या सदस्यांना शिकवली जाणार आहे. दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता महाप्रशिक्षण अभियानांतर्गत हे धडे दिले जाणार असून, देशपातळीपासून मंडल पातळीपर्यंत हे सत्र तीन महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे.केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर देशपातळीवर भाजपा सदस्य नोंदणी राबविण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. नाशिकचाच विचार केला, तर २ लाख ६५ हजार सभासद झाल्याचे सांगितले जात आहे. अशावेळी ज्यांना पक्षाचा देशपातळीवरील आणि राज्य पातळीवरील इतिहास माहिती नाही अशांना केवळ कार्यकर्ता म्हणून कागदोपत्री ठेवण्यापेक्षा त्यांना पक्षाचा इतिहास सांगण्यासाठी पं. दीनदयाळ उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्रीय पातळीपासून स्थानिक स्तरावर मंडल पातळीपर्यंत राबविण्यात येणाऱ्या या शिबिराच्या माध्यमातून जनसंघ, भाजपाचा इतिहास ते स्थानिक पातळीवर पक्षाची स्थापना, जुने कार्यकर्ते अशी सर्वच माहिती दिली जाणार आहे. सरकार आणि संघटना समन्वयाबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. नाशिक विभागात प्रशिक्षणाची जबाबदारी माजी शहराध्यक्ष विजय साने यांच्यावर सोपविण्यात आली असून, त्यांनी पाचही जिल्ह्यांतील शहर जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली आणि नियोजन केले. विभागस्तरावर प्रशिक्षण नाशिकमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नवख्या कार्यकर्त्यांना धडे
By admin | Updated: July 29, 2015 00:26 IST