बैलगाडीतून होणाऱ्या वाळू उपशाकडे तहसीलची पाठ
By Admin | Updated: January 11, 2016 21:58 IST2016-01-11T21:55:17+5:302016-01-11T21:58:00+5:30
बैलगाडीतून होणाऱ्या वाळू उपशाकडे तहसीलची पाठ

बैलगाडीतून होणाऱ्या वाळू उपशाकडे तहसीलची पाठ
मालेगाव : बैलगाडीद्वारे केल्या जाणाऱ्या नदीपात्रातील वाळू उपशाकडे येथील तहसील कार्यालयाने डोळेझाक केल्याने लाखो रुपये किमतीच्या वाळूची राजरोस चोरी केली जात आहे. यामुळे नदीपात्र कोरडेठाक झाले आहे.
येथील गिरणा व मोसम नदीपात्रात सर्रास वाळू उपसा केला जात आहे. यासाठी टॅक्टर, ट्रक आदि साधनांचा वापर करण्यात येतो. मात्र या वाहनांवर कारवाई केली जात असल्याने बैलगाडीने वाळू चोरीची पद्धत गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. बैल सांभाळावे लागत असल्याच्या नावाखाली या चोरीकडे तहसील विभागाने काणाडोळा केल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बैलगाडीवाल्यांची संख्या वाढली आहे.
एका बैलगाडीत सुमारे अर्धा ब्रासच्या आसपास वाळू बसत असून, एका बैलगाडीची किंमत पाचशे ते सहाशे रुपयांच्या घरात आहे. एक बैलगाडी दिवसाला चार ते पाच फेऱ्या मारतात. यामुळे बंधारा परिसरातील वाळू पूर्णपणे नष्ट झाली आहे. नदीपात्रात सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. असाच काहीसा प्रकार मोसम नदीपात्रातील आहे. या पात्रात वडगाव परिसरात बैलगाडीने उपसा केला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे हरणबारीचे पाणी पुढे जाण्यास मोठ्या अडचणी आल्या होत्या.
या बैलगाड्यांच्या गाड्या जप्त करून हा वाळू उपसा थांबवावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)