मानोलीमध्ये बिबट्या जेरबंद
By Admin | Updated: July 28, 2016 01:04 IST2016-07-28T00:39:58+5:302016-07-28T01:04:45+5:30
मानोलीमध्ये बिबट्या जेरबंद

मानोलीमध्ये बिबट्या जेरबंद
नाशिक : दरी-मातोरीपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोली गावामध्ये बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पिंजऱ्यात पाच वर्ष वयाचा बिबट्या (नर) जेरबंद झाला.
गेल्या महिनाभरापासून या भागात बिबट्या नागरिकांना विविध ठिकाणी रात्री-मध्यरात्री, पहाटे दर्शन देत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्या एकापेक्षा अधिक असल्याचा अंदाज रहिवाशांनी व्यक्त केला होता; मात्र नागरिकांच्या तक्रारीवरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, काही ठिकाणी शेतांमध्ये बिबट्यांच्या पावलांची ठसे आढळून आले. यावेळी येथील एका शेताच्या बांधालगत वनविभागाने शास्त्रीय पद्धतीने पिंजरा लावला. या पिंजऱ्यात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्य शोधताना पिंजरा अखेर जेरबंद झाला आणि रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याबाबतची माहिती नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याच्या ठिकाणी जाऊन सुरक्षितरीत्या पिंजरा रेस्क्यू केला.
रहिवाशांनी यावेळी कर्मचाऱ्यांकडे आणखी एक पिंजरा लावण्याची मागणी लावून धरली होती. कारण या भागात आणखी बिबट्यांचा संचार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत दुसरा पिंजरा येथे लावला जात नाही तोपर्यंत पिंजरा हलवायचा नाही, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली; अखेर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढत पिंजरा अन्य ठिकाणांहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर पिंजरा आणता येईल, असे सांगून लवकरच पिंजरा लावला जाणार असल्याचे आश्वासन दिले.
पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन यांनी जेरबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी क रून प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बिबट्याला दोन दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून त्यानंतर जिल्ह्यातील नैसर्गिक अधिवासात बिबट्याला मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)