बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By Admin | Updated: March 3, 2017 00:30 IST2017-03-03T00:29:51+5:302017-03-03T00:30:01+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारातील काळेवाडी येथे गुरुवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली.

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारातील काळेवाडी येथे गुरुवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
ठाणगाव-काळेवाडी रस्त्यावर पाचखळा वस्ती आहे. मधुकर नरहरी आव्हाड यांची शेत गट नंबर १०८० मध्ये शेती आहे. शेतात आव्हाड यांनी जनावरांसाठी झाप बांधलेला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी आव्हाड यांनी झापात दोन गायी बांधल्या व गावातील घरी आले. गुरुवारी पहाटे बिबट्याने झापात प्रवेश करून गायीचा फडशा पाडला. गुरुवारी पहाटे आव्हाड दूध आणण्यासाठी मळ्यात गेल्यानंतर त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास आव्हाड यांच्या वस्तीवर बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज येत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. ्रआव्हाड यांनी पहाटे वस्तीवर गेल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. वनविभागाचे वनरक्षक तानाजी भुजबळ, शंकर शेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
काळेवाडी शिवारातील पाचखळी भागात बिबट्याचा नेहमी वावर असतो. उन्हाळा सुरू होताच जंगलात टंचाईची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे वन्यप्राणी वस्तीवर पाणी पिण्यासाठी येऊ लागले आहेत. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)