महालखेडा शिवारात बिबट्या जेरबंद
By Admin | Updated: March 3, 2017 00:27 IST2017-03-03T00:27:37+5:302017-03-03T00:27:47+5:30
येवला : तालुक्यातील महालखेडा परिसरात बिबट्या विहिरीत पडल्याचे आढळून आले. गुरुवारी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात त्याला अटकण्यात आला.

महालखेडा शिवारात बिबट्या जेरबंद
येवला : तालुक्यातील महालखेडा परिसरात गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या विहिरीत पडल्याचे आढळून आले. गुरुवारी (दि. २) सकाळी १० वाजेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात त्याला अटकण्यात आला.
महालखेडा परिसरात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याची चाहूल असल्याचे वस्तीवरील ग्रामस्थांना लागली होती. त्याबाबत परिसरात चर्चाही होती. दरम्यान, मंगळवारी रात्री या बिबट्याने महालखेडा परिसरात तुळशीराम डोलणार यांच्या वस्तीवर एका शेळीला फस्त केले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. निफाड वनविभागाचे अधिकारी व पथकाने या भागात बुधवारी भेट देऊन तपास केला होता. परंतु काहीही आढळून आले नव्हते. गुरुवारी सकाळी ९ वाजता महालखेडा येथील शेतकरी बाळासाहेब ताडगे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला असल्याचे लक्षात आले.
भ्रमणध्वनीवरून निफाड वनविभागाशी संपर्क साधून पथकाला पाचारण करण्यात आले. क्रेनसह पिंजरा व सर्व साहित्य घेऊन पथक महालखेड्यात दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात आला. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बुधवारी रात्री बिबट्या विहिरीत पडल्यानंतर येवला प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी बी.आर.
ढाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार वनरक्षक अशोक काळे, प्रसाद पाटील,वनपाल योगीता खिरकाडे, वनसेवक दिलीप अहिरे, कर्मचारी योगेश काळे, पिंटू नहिरे, रामचंद्र गंडे, भरत माळी, विजय लोंढे यांच्या पथकाने विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला
पकडण्याची कामगिरी केली. बिबट्या हा पाच ते सहा महिन्याचा असल्याचे वनविभागाने सांगितले. (वार्ताहर )