सुरगाणा : भक्ष्याच्या शोधात बिबट्या खोल विहिरीत पडल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील खोकरविहीर येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली.शुक्रवारी सकाळी खोकरविहीर येथील महिला मंगला महाले या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या असता विहिरीत बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यांनी सदर माहिती ग्रामस्थांना दिली. ही खबर बाºहे वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुरेश गवारी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देण्यात आल्यानंतर ते त्वरित दाखल झाले. वनक्षेत्रपाल गवारी व गटविकास अधिकारी पगार यांनी त्यांचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला शिडी टाकून बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न केले. मात्र बिबट्या शिडीच्या साहाय्याने बाहेर येत नव्हता. त्यानंतर दोराला खाट बांधून बिबट्याजवळ सोडण्यात आली. तरीही बिबट्या खाटेवर न येता तो कपारीत जाऊन बसत होता. सदर बिबट्या रात्रीच्या वेळेस एखाद्या भक्ष्याच्या नादात विहिरीत पडला असावा.नाशिक येथील रेस्क्यु टीमला माहिती देण्यात आली आहे.बिबट्या ज्या विहिरीत पडला तिचे नुकतेच बांधकाम झालेले असून, सुदैवाने विहिरीतील उभ्या गजांवर हा बिबट्या पडला नाही. त्याच्या उजव्या पायाला छोटी जखम झाली असल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले. एकदा डरकाळी फोडल्यानंतर बिबट्या थकलेला जाणवत होता. शर्थीचे प्रयत्न करूनही तो बाहेर आला नाही. तो विहिरीतून बाहेर न पडल्याने खोकरविहीर व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्या अडकला विहिरीच्या कपारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:01 IST