अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:26+5:302021-09-02T04:29:26+5:30

गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील लष्करी हद्दीजवळ पोल्ट्री फार्मजवळ बुधवारी (दि. १) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान ...

Leopard confiscated for several days | अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा बिबट्या जेरबंद

अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा बिबट्या जेरबंद

गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील लष्करी हद्दीजवळ पोल्ट्री फार्मजवळ बुधवारी (दि. १) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बेलगाव कुऱ्हे येथील पोल्ट्री व्यावसायिक संजय गुळवे यांच्या पोल्ट्री शेडजवळ काल सायंकाळी वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूला सावज म्हणून शेळी बांधण्यात आली होती. पहाटे चार वाजताच्या निरव शांततेत बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर डरकाळ्यांनी तेथील कामगारांना जाग आली. बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करीत होता. पिंजऱ्याच्या लोखंडी जाळ्यांना जोरदार धडका देऊन अक्षरशः रक्तबंबाळ झाला होता. सकाळी बातमी कळताच, बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभागाला माहिती देताच, वनविभागाचे वाडीवऱ्हेचे वनपरिक्षेत्र अधिकारी के. उ. बिरारी आपल्या रेस्क्यू व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चवताळलेल्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर, पिंजरा रेस्क्यू व्हॅनला लावून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात सोडून देण्यासाठी घेऊन गेले. जेरबंद केलेला बिबट्या साडेचार वर्षे वयाचा आणि मादी प्रकारातील असल्याचे बिरारी यांनी सांगितले. या वेळी वनरक्षक के.व्ही. पाटील, एस.पी. थोरात, चालक मुल्लाभाई आदींसह रेस्क्यू टीमसह वन कर्मचारी उपस्थित होते.

----------------

याआधीदेखील मागील वर्षी आमच्या पोल्ट्री शेडजवळ वनविभागाने पिंजरा लावून एक बिबट्या पकडला होता. त्यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलेला तसेच गायी, म्हशी, वासरे, श्वान आदी पाळीव प्राण्यांना फस्त करून पशुपालकांचे प्रचंड नुकसान करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केल्याने पशुपालकांसह, शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

- संजय गुळवे, माजी सरपंच, बेलगाव कुऱ्हे

------------------

बेलगाव कुऱ्हे येथील संजय गुळवे यांच्या पोल्ट्री शेडजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या. (०१ गोंदे)

010921\01nsk_12_01092021_13.jpg

०१ गोंदे

Web Title: Leopard confiscated for several days