खेडभैरव देवाची वाडी शिवारात बालिकेवर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST2021-03-04T04:27:01+5:302021-03-04T04:27:01+5:30
मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खेडभैरव येथील देवाची वाडी शिवारातील पुंडलिक डगळे यांची मुलगी किरण (६) ही आजी व ...

खेडभैरव देवाची वाडी शिवारात बालिकेवर बिबट्याचा हल्ला
मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खेडभैरव येथील देवाची वाडी शिवारातील पुंडलिक डगळे यांची मुलगी किरण (६) ही आजी व बहिणीसोबत नेहमीप्रमाणे मंदिर परिसरातील दुकानातून पायवाटेने घरी जात होती. याच दरम्यान जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून किरण हिच्यावर हल्ला चढवला. प्रारंभी तिची आजी घाबरल्याने त्यांनी जोरात आरडाओरड केली. त्यानंतर धाडस करून बिबट्याला प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याच्या तावडीतून नातीची सुटका झाली.
सदर घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी याबाबत तत्काळ वनविभागास माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. इगतपुरी तालुक्यात सतत होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामीण भागात नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.
वनविभागाचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपाल ढोन्नर, रेश्मा पाठक, पाडवी, सय्यद, मुनिफ शेख आदींनी परिसरात गस्त घालून बिबट्याचा मागोवा घेतला. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.
दरम्यान वनविभागाच्या फिरत्या पथकाचे प्रमुख पाटील यांनी पथकाला घटनास्थळी येऊन बिबट्यास जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या.
===Photopath===
030321\03nsk_39_03032021_13.jpg
===Caption===
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली बालिका.