कर्जमाफी मिळण्याची शक्यता बळावली !
By Admin | Updated: March 11, 2017 23:28 IST2017-03-11T23:28:13+5:302017-03-11T23:28:31+5:30
नाशिक : शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन निवडणूक प्रचारात दिल्यामुळेच उत्तर प्रदेशात भाजपाला बहुमत मिळाले, असा दावा केला जात असून तोच धागा पकडून महाराष्ट्रातील शेतकरीही आशावादी झाले आहेत.

कर्जमाफी मिळण्याची शक्यता बळावली !
नाशिक : शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन निवडणूक प्रचारात दिल्यामुळेच उत्तर प्रदेशात भाजपाला बहुमत मिळाले, असा दावा केला जात असून तोच धागा पकडून महाराष्ट्रातील शेतकरीही आशावादी झाले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्याने या पक्षाचा सत्तास्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भाजपाच्या या विजयाचा जितका आनंद कार्यकर्त्यांना झाला तितकाच आनंद शेतकरीही व्यक्त करीत आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणूक जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. जाहीर सभांमधून त्याचा वारंवार उल्लेखही करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा करणारे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातही सरकार असून, जो न्याय उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांसाठी लावला जात आहे, तोच न्याय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही लागू करून त्यांनाही कर्जमुक्त करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. अर्थातच हा निवडणूक जुमला असल्याचे समजून त्याबाबत फारसे कोणी मनावर घेत नसले तरी आता निवडणूक निकालानंतर भाजपाच्या हाती उत्तर प्रदेशची सत्ता आल्याने निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनांची त्यांना पूर्तता करावी लागणार आहे.