निवृत्त उपअभियंत्याची ‘एलईडी’प्रकरणी चौकशी

By Admin | Updated: June 30, 2016 00:17 IST2016-06-30T00:10:41+5:302016-06-30T00:17:25+5:30

महासभेत प्रस्ताव : अनियमिततेचा आरोप

'LED' case inquiry of retired sub-agent | निवृत्त उपअभियंत्याची ‘एलईडी’प्रकरणी चौकशी

निवृत्त उपअभियंत्याची ‘एलईडी’प्रकरणी चौकशी

नाशिक : शहरातील अस्तित्वात असलेले पथदीप काढून बीओटी तत्त्वावर एलईडी फिटिंग बसविण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेबद्दल ठपका ठेवत महापालिका आयुक्तांनी विद्युत विभागातील तत्कालीन उपअभियंता (सध्या निवृत्त) नारायण गोपाळराव आगरकर यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. तब्बल चार वर्षांनंतर आयुक्तांनी सदर प्रकरण बाहेर काढत महापालिकेच्या फसवणुकीबद्दल उपअभियंत्यावर दोषारोप ठेवले आहेत.
गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत एलईडी फिटिंगचा घोटाळा चर्चेत राहात आलेला आहे. सुमारे २०२ कोटी रुपयांच्या एलईडी फिटिंगच्या कामात महापालिकेची फसवणूक झाल्याचा आरोप वारंवार महासभांमधून सदस्य करत आलेले आहेत. याबाबत प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. दरम्यान, महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी एलईडी घोटाळाप्रकरणी मुख्य लेखापरीक्षक आणि अधीक्षक अभियंता (भुगयो) यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानुसार, चौकशी समितीने आपला तपासणी अहवाल सादर केला असून, त्यात बीओटी तत्त्वावर एलईडी फिटिंग बसविणे या कामासंदर्भात निविदापूर्व प्रक्रियेतील त्रुटी, निविदा प्रक्रियेतील त्रुटी, करारनामा व कार्यादेशातील त्रुटी निदर्शनास आल्या. त्यानुसार, विद्युत विभागातील तत्कालीन उपअभियंता नारायण गोपाळराव आगरकर यांची भूमिका संशयास्पद राहिल्याचे समोर आले आहे. सदर तपासणी अहवालावरून आगरकर यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून महापालिकेच्या आर्थिक हिताकडे दुर्लक्ष करून फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आगरकर हे दि. ३१ जानेवारी २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, एलईडी फिटिंगप्रकरणी कार्यादेश हा २८ आॅक्टोबर २०१३ रोजी देण्यात आल्याने घटनेला तब्बल चार वर्षांनंतर आगरकर यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
घटना घडल्यापासून सदर चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून चौकशीसाठी नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या मान्यतेचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'LED' case inquiry of retired sub-agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.