सिन्नर महाविद्यालयात प्रबोधिनीनिमित्त व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:12+5:302021-07-30T04:14:12+5:30
जनसेवा संस्थेतर्फे पूरग्रस्तांना मदत सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फेरी काढून जीवनावश्यक वस्तू ...

सिन्नर महाविद्यालयात प्रबोधिनीनिमित्त व्याख्यान
जनसेवा संस्थेतर्फे पूरग्रस्तांना मदत
सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फेरी काढून जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य जमा केले. जमा झालेले सर्व साहित्य सिन्नर येथील जनसेवा मंडळाकडे सुपूर्द केले असून, या साहित्यांचे प्रत्येक कुटुंबांसाठी एक असे किट बनविण्यात आले. जमा झालेले सर्व साहित्य चिपळूणच्या दिशेने निघेल, असे जनसेवा सेवाभावी संस्थेचे सदस्य अर्जुन आव्हाड यांनी सांगितले.
पंचाळे येथील गडाख विद्यालयात वृक्षारोपण
सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथील सिन्नरभूषण स्व. सूर्यभान गडाख विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनातून शाळेत विविध उपक्रम राबविले जात आहेत. साळुंके यांनी शाळेला भेट देऊन इमारत, प्रयोगशाळा, संगणक कक्ष व उपक्रमाची माहिती घेऊन कौतुक केले. यावेळी केंद्रप्रमुख शिवाजी बर्गे, मुख्याध्याक एस. पी. शिंदे, आर. एस. गडाख, विश्वनाथ शिरोळे, एन. ए. थोरात यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
नाशिकला बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी
सिन्नर : उपनगरातील विजयनगर भागातून थेट नाशिकला जाण्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी सिन्नर तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्यामसुंदर झळके यांनी आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिन्नर येथून नाशिकला नोकरी व्यवसाय तसेच सरकारी कामासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. सिन्नर शहर व लगतच्या उपनगरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बसस्थानकावर येण्यासाठी रिक्षा अथवा इतर खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते.
वडांगळी उपबाजारात सुरू होणार टमाटा लिलाव
सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर टमाटा लिलाव सुरू करणार असल्याची माहिती सभापती लक्ष्मणराव शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांनी दिली. वडांगळी व परिसरात टमाट्याचे चांगले उत्पादन होते. मात्र बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना टमाटा विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठेत जावे लागत असल्याने उपबाजारात टमाटा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.