Hemlata Patil Ajit Pawar: मध्यंतरी लांबलेले पक्षप्रवेश सोहळे पुन्हा सुरू होत असून, काँग्रेसच्या माजी प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील यांची पक्षप्रवेशाची तारीख ठरली आहे. मंगळवारी (१९ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेकांनी पक्षांतर केले आणि भाजपा तसेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी उपनेते सुनील बागुल, माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे तसेच राष्ट्रवादीचे गणेश गीते यांचे प्रवेश सोहळे विशेष गाजले.
नाशिक महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या आणि काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रवेश निश्चित झाला आहे. मंगळवारी (१९ ऑगस्ट) मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
एकनाथ शिंदेंची साथ सोडून आता अजित पवारांकडे
गेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून डॉ. हेमलता पाटील यांनी तत्कालीन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना चांगली लढत देऊन ४६ हजार मते मिळवली होती. गेल्यावेळी महाविकास आघाडीला लोकसभेत कौल मिळाल्याने त्यांना अनुकूल वातावरण असताना त्यांच्याऐवजी ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती.
त्यामुळे नाराज झालेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. शिंदेसेनेतील स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे त्यांनी तेथेही राजीनामा दिला होता. दरम्यान, आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असून, मंगळवारी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची निवड का?
'राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसचा समविचारी पक्ष असल्यामुळे या पक्षात काम करणे सोयीचे वाटते. त्यासाठीच राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कामाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कोणत्याही लोकहिताच्या कामासाठी ते तत्काळ निर्णय घेत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला', अशी भूमिका डॉ. हेमतला पाटील यांनी पक्षप्रवेशापूर्वी मांडली आहे.