‘त्या’महिलेची कारागृहात रवानगी
By Admin | Updated: May 9, 2017 01:58 IST2017-05-09T01:57:58+5:302017-05-09T01:58:06+5:30
मनमाड : बालिकेच्या अपहरण संशयित महिला आरोपी अनामिका सुरेशराम मांजी हिची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

‘त्या’महिलेची कारागृहात रवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : तपोवन एक्स्प्रेसमधील चारवर्षीय बालिकेच्या अपहरणाचा गुन्हा औरंगाबाद येथून मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. संशयित महिला आरोपी अनामिका सुरेशराम मांजी हिला मनमाड न्यायालयासमोर उभे केले असता, तिची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
कल्याण येथून परभणी येथे तपोवन एक्स्प्रेसने जात असलेल्या रामेश्वर माधव केंद्रे यांची चारवर्षीय बालिका ईश्वरी ही मनमाड रेल्वेस्थानकादरम्यान लघुशंकेसाठी आईसमवेत स्वच्छतागृहाकडे गेली होती. दरम्यान संशयित महिला अनामिका हिने ईश्वरीला उचलून घेत दुसऱ्या डब्यामध्ये निघून गेली. ईश्वरी गायब झाल्याचे लक्षात येताच तिच्या परिवारातील सदस्यांनी व प्रवाशांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. एका महिलेने उचलून पुढे नेल्याची माहिती प्रवाशांकडून समजल्याने शोध सुरू केला. काही डबे पार केल्यानंतर नगरसूल रेल्वेस्थानकानजीक आरोपी अनामिकाच्या ताब्यात ईश्वरी दिसली. नातेवाइकांनी अनामिकाच्या ताब्यातून बालिकेची सुटका केली.
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस व रेसुब कर्मचाऱ्यांनी अनामिका हिला ताब्यात घेउन अटक केली.
या प्रकरणी संशयीत आरोपी अनामिका सुरेशराम मांजी रा: झारखंड हिच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार मनमाड हद्दीत घडल्याने हा गुन्हा मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.मनमाड लोहमार्ग पोलिसांनी आरोपी अनामिका हिची मनमाड उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. येथील न्यायालयासमोर उभे केले असता तिची मध्यवर्ती कारागृहात रवाणगी करण्यात आली आहे.