धात्रक फाटा येथील जलकुंभाला गळती
By Admin | Updated: July 23, 2014 00:26 IST2014-07-22T23:39:46+5:302014-07-23T00:26:02+5:30
पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या जलकुंभाला गेल्या वर्षापासून गळती लागली

धात्रक फाटा येथील जलकुंभाला गळती
पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या जलकुंभाला गेल्या वर्षापासून गळती लागली असून, दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जलकुंभातून होणारी पाण्याची गळती थांबवावी याबाबत मनपा आयुक्त तसेच पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
धात्रक फाटा येथे मनपाचा जलकुंभ असून, या जलकुंभातून प्रभाग क्रमांक ३ तसेच अन्य भागात पाणीपुरवठा केला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून या जलकुंभाला गळती लागली आहे. जलकुंभाला जोडली जाणारी वाहिनी नादुरुस्त असल्याने तसेच जलकुंभाच्या बांधकामातून पाणी बाहेर येत असल्याने सध्या सायंकाळच्या सुमारास लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाने सध्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया जात असले, तरी प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)