जलकुंभाला जोडलेल्या जलवाहिनीला गळती
By Admin | Updated: October 24, 2015 22:06 IST2015-10-24T22:05:30+5:302015-10-24T22:06:23+5:30
हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया

जलकुंभाला जोडलेल्या जलवाहिनीला गळती
पंचवटी : यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील जलसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने काही दिवसांपासून पाणीकपात केली खरी; मात्र हिरावाडीतील पाण्याच्या पाटालगत गेल्या अनेक महिन्यांपासून जलकुंभाला जोडल्या जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने दैनंदिन हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे जलकुंभाला जोडली जाणारी ही जलवाहिनी असून, तिलाच गळती लागल्याने पाणीकपातीचा फायदा काय, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वजे्रश्वरी ते हिरावाडी पाण्याच्या पाटालगत असलेल्या जलवाहिनीला गळती लागली असली तरी, याकडे पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधले गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणात जलसाठा कमी असल्याच्या कारणावरून प्रशासनाने एकवेळ पाणीकपात केली आहे. परंतु हिरावाडी पाण्याच्या पाटालगत जलवाहिनीला गळती लागलेली असल्याने पाणी बचतीपेक्षा अधिकच वाया जात आहे. पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्याने पाणी गळती थांबविणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे. एकीकडे मनपा प्रशासन पाणी बचतीबाबत जनजागृती करत असले तरी दुसरीकडे पाणी गळतीकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. (वार्ताहर)