देवपूर विद्यालयाची स्वाती करणार महाराष्ट्राचे नेतृत्व
By Admin | Updated: December 3, 2015 23:15 IST2015-12-03T23:14:36+5:302015-12-03T23:15:22+5:30
थांग-ता : राज्यस्तरीय स्पर्धेत दिली अंतिम फेरीत धडक

देवपूर विद्यालयाची स्वाती करणार महाराष्ट्राचे नेतृत्व
पाथरे : सिन्नर तालुक्यातील देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मीरज (सांगली) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय थांग-ता स्पर्धेत यश मिळवले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी स्वाती शिरोळे ही पुढील आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.
मिरज (जि. सांगली) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय थांग-ता स्पर्धेत देवपूर विद्यालयाच्या रोहिणी उगले, विशाल खोले, सरोज उगले व स्वाती शिरोळे या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. दहावीत शिकणाऱ्या स्वाती शिरोळे हिने या स्पर्धेत नागपूर व अमरावती येथील स्पर्धकांना सहज पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. या कामगिरीमुळे १३ डिसेंबर रोजी इम्फाळ (मणिपूर) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत स्वाती महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक शंकर गुरुळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या कामगिरीबद्दल देवपूर विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात आजही मुलींना ओझे समजण्याची मानसिकता पूर्णत: बदललेली नाही. मात्र, मुलींनी कोणत्याही क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केल्याने समाजाचा तिच्यासह इतर स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत असतो. त्यामुळे सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी मुलींनी परिश्रम घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी केले.
याप्रसंगी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे पदाधिकारी अण्णासाहेब गडाख, विजय गडाख, राजेश गडाख, दौलत मोगल, पर्यवेक्षक परशराम रानडे, भाऊसाहेब शिरोळे, सुमन मुंगसे, शिवाजी घोटेकर, श्रीहरी सैंद्रे, वैशाली पाटील, एन. जे. खुळे, सुनील पगार, बाळासाहेब कुमावत, भीमराव अढांगळे, ताराबाई व्यवहारे, दत्तात्रय आदिक, मीननाथ जाधव, शांताराम महाले, सुवर्णा मोगल, विलास पाटील, वैभव गडाख, रवींद्र गडाख आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. प्रमोद बधान यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)