एलबीटी अनुदानात प्रतिमाह २३ कोटींची कपात?
By Admin | Updated: October 23, 2015 22:43 IST2015-10-23T22:41:39+5:302015-10-23T22:43:25+5:30
उत्पन्न ५०२ कोटींवर : भविष्यात सतावणार चिंता; लेखाविभाग मात्र आशावादी

एलबीटी अनुदानात प्रतिमाह २३ कोटींची कपात?
नाशिक : महापालिकेने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात एलबीटीच्या माध्यमातून ५०० कोटींच्या वर उत्पन्नाचा टप्पा गाठल्याने राज्य शासनाकडून उर्वरित पाच महिन्यांच्या अनुदानात प्रतिमाह सुमारे २८ कोटींची कपात होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, येता काळ महापालिकेसाठी कठीण असल्याची भीतीही प्रशासकीय स्तरावर व्यक्त केली जात असल्याने एकूणच चिंता वाढल्या आहेत.
राज्य शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटींच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द केला. त्या मोबदल्यात राज्य शासनाने गेल्या पाच वर्षांत महापालिकेने सर्वाधिक मिळविलेल्या उत्पन्नावर ८ टक्के वाढ धरत अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ५० कोटींच्या वरील उलाढालीवर एलबीटी आकारणीस महापालिकेला मान्यता दिली. शासनाच्या निर्णयानुसार नाशिक महापालिकेला राज्य शासनाकडून ८ टक्के वाढ गृहीत धरून सुमारे ७५१ कोटी रुपये सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी वितरित केले जाणार आहेत. दरम्यान, महापालिकेने एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात पूर्णपणे एलबीटी, तर आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या काळात ५० कोटी रुपयांच्या वरील एलबीटी आकारणीसह एकूण ५०२ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले
आहे.
महापालिकेला राज्य शासनाकडून आतापर्यंत प्रतिमाह ४५.८७ कोटी याप्रमाणे १३७.६१ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. याव्यतिरिक्त एप्रिल ते जून या कालावधीत १ टक्के मुद्रांक शुल्क अधिभाराचीही रक्कम मिळालेली आहे. महापालिकेने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत ५०० कोटीहून अधिक उत्पन्न एलबीटीच्या माध्यमातून प्राप्त केल्याने उर्वरित पाच महिन्यांत महापालिकेला आता एलबीटी व मुद्रांक शुल्क यांचे एकत्रित मिळून ८६ कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच महापालिकेला दरमहा १७ कोटी रुपये अनुदान मिळेल. परिणामी, दरमहा २८ कोटी रुपयांनी अनुदान कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लेखा विभागाने मात्र, अनुदानात अशा कपातीची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)