चार महिन्यांत २५४ कोटी रुपये एलबीटी
By Admin | Updated: July 29, 2015 23:59 IST2015-07-29T23:59:10+5:302015-07-29T23:59:56+5:30
महापालिकेला दिलासा : गतवर्षाच्या तुलनेत १८ टक्के वाढ

चार महिन्यांत २५४ कोटी रुपये एलबीटी
नाशिक : येत्या एक आॅगस्टपासून सरसकट एलबीटी रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतरही नाशिक महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांत २५४ कोटी ५८ लाख रुपयांची कमाई झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत एलबीटीमध्ये १८ टक्के वाढ झाल्याने प्रशासनाला दिलासा लाभला आहे.
राज्य सरकारने २४ जुलै रोजी अधिसूचना काढत ५० कोटी रुपयांच्या आतील व्यापारी-व्यावसायिकांना एलबीटी पूर्णपणे रद्द करण्याची तयारी चालविली आहे. त्याबाबत शासनाने हरकती व सूचनाही मागविल्या आहेत. एलबीटी रद्द होण्याच्या घोषणेमुळे महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात कमालीची घट होईल, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच गेल्या चार महिन्यांत महापालिकेला २५४ कोटी ५८ लाख रुपयांचा महसूल एलबीटीच्या माध्यमातून जमा झाला आहे.
मागील वर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत महापालिकेला २१५ कोटी ६२ लाख रुपये एलबीटी जमा झाला होता. यंदा एप्रिल ते जुलै या कालावधीत २५४ कोटी ५८ लाख रुपये जमा झाले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत एलबीटीमध्ये ३८ कोटी ९५ लाखांनी वाढ झाली असून ही वाढ १८ टक्के इतकी आहे. चार महिन्यांतच महापालिकेच्या खजिन्यात २५४ कोटी रुपये जमा झाल्याने प्रशासनाला दिलासा लाभला आहे. राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत नाशिक महापालिकेने समाधानकारक वसुली केली असली तरी यापुढे एलबीटी सरसकट रद्द झाल्यास महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे राहण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)