लक्ष्मीपूजन उत्साहात आतषबाजीने उजळला आसमंत
By Admin | Updated: November 11, 2015 23:15 IST2015-11-11T23:14:39+5:302015-11-11T23:15:24+5:30
लक्ष्मीपूजन उत्साहात आतषबाजीने उजळला आसमंत

लक्ष्मीपूजन उत्साहात आतषबाजीने उजळला आसमंत
नाशिक : दीपोत्सवात अनन्यसाधारण महत्त्व असलेले लक्ष्मीपूजन बुधवारी शहरात सर्वत्र उत्साहात झाले. लक्ष्मी, कुबेर आणि सरस्वतीचे विधिवत पूजन झाल्यानंतर शहरात सायंकाळी प्रकाशाच्या उत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला. फटाक्यांच्या नयनमनोहर आतषबाजीने रात्री उशिरापर्यंत सारे आसमंत उजळून निघाले होते.
सकाळपासूनच घरोघरी लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली होती. अंगणात केलेल्या सडा-रांगोळीने वातावरण चैतन्यमय झाले. दीप प्रज्वलित करीत लक्ष्मीला सोनपावलाने येण्याचे आवाहन करण्यात आले. सायंकाळी मुहूर्तावर लक्ष्मी, कुबेर आणि सरस्वतीचे पूजन करण्यात आले. धनाचे प्रतीक असलेले धने, समृद्धीचे प्रतीक असलेल्या लाह्या, गूळ, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवत लक्ष्मीची प्रार्थना करण्यात आली. नवीन झाडू-केरसुणीचेही पूजन करण्यात आले. बाजारपेठांतील व्यापारी पेढ्यांवर जमा-खर्चाच्या, कीर्द खतावणीच्या नवीन वह्यांची पूजा करण्यात आली. सोशल नेटवर्किंग साईट्स, व्हॉट्स अॅपद्वारे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा सिलसिला दिवसभर सुरू होता.
दरम्यान, लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांच्या आवाजाने अवघे शहर दुमदुमून गेले. फटाक्यांच्या रोषणाईने अवघे आभाळ उजळून निघाले होते. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी शहरातील मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)