वसाकाच्या गळीत हंगामाचा १५ ला शुभारंभ
By Admin | Updated: November 14, 2016 00:35 IST2016-11-14T00:21:21+5:302016-11-14T00:35:35+5:30
वसाकाच्या गळीत हंगामाचा १५ ला शुभारंभ

वसाकाच्या गळीत हंगामाचा १५ ला शुभारंभ
देवळा / लोहोणेर : गतवर्षी मोठ्या प्रयत्नांंनी सुरू झालेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची चाके या वर्षी कर्जपुरवठ्याअभावी फिरतील काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु वसाका सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, येत्या १५ डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वसाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व वसाका प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहुल अहेर यांनी दिली. कारखान्याच्या प्राधिकृत मंडळाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मागील गळीत हंगाम यशस्वी केल्यानंतर आगामी गळीत हंगामासाठी सुमारे तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
देवळा येथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार डॉ. अहेर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती थकीत कर्जांमुळे खालावली होती. यामुळे गतवर्षी वसाका सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर ९३ हजार टन उसाचे गाळप करण्यात येऊन नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यात आली होती. यामुळे चालू वर्षी जिल्हा बँक वसाकाला कर्जपुरवठा वेळेवर करेल व कारखाना सुरळीतपणे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व सभासद होते. परंतु जिल्हा बँकेने निधीअभावी वसाकाला वित्तपुरवठा करण्यात असमर्थता व्यक्त केली होती. यामुळे वसाकाच्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्यांपुढे गतवर्षी सुरू केलेला वसाका चालूवर्षी सुरू राहण्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? ही समस्या उभी राहिली. आगामी गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू व्हावा यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी आमदार डॉ. राहुल अहेर सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत होते.
नुकत्याच ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला ही बाब वसाकाच्या पथ्यावर पडली. कर्ज भरणापोटी जिल्हा बँकेने रद्द झालेल्या नोटा शासनाच्या निर्देशानुसार स्वीकारण्यास सुरु वात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बँकेत भरणा सुरू झाला व आर्थिक संकटात सापडलेली जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. यामुळे वसाकाला कर्ज पुरवठा करण्याबाबत जिल्हा बँक राजी झाली असून, वसाकाला कर्ज पुरवठा केला जाणार आहे. यामुळे १५ डिसेंबर रोजी वसाकाचा गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू होणार आहे. (वार्ताहर)