संत समागमचा शोभायात्रेने शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:09 IST2020-01-24T23:35:38+5:302020-01-25T00:09:18+5:30
लाखो भाविकांच्या मुखातून निघणारा धन निरंकारचा जयघोष...पंजाबी नृत्यापासून आदिवासी नृत्यापर्यंत विविध समाजांचे लोकजीवन दर्शवित पुढे सरकणारे हजारो कलाकार... लेजीम, झांजपथक, पारंपरिक वाद्यांनी धरलेला ठेका...शिस्तबद्धतेने सहभागी तुळशी कलशधारी महिला, पावरा नृत्य करणारे आदिवासी तरुण-तरुणी आणि आकर्षक फुलांनी सजविलेल्या वाहनामध्ये प्रसन्न मुद्रेने विराजमान माता सुदीक्षाजी यांच्या अतिविराट मिरवणुकीने संत निरंकारी समागम सोहळ्याचा शुभारंभ झाला.

शोभायात्रेत सहभागी भाविक.
नाशिक : लाखो भाविकांच्या मुखातून निघणारा धन निरंकारचा जयघोष...पंजाबी नृत्यापासून आदिवासी नृत्यापर्यंत विविध समाजांचे लोकजीवन दर्शवित पुढे सरकणारे हजारो कलाकार... लेजीम, झांजपथक, पारंपरिक वाद्यांनी धरलेला ठेका...शिस्तबद्धतेने सहभागी तुळशी कलशधारी महिला, पावरा नृत्य करणारे आदिवासी तरुण-तरुणी आणि आकर्षक फुलांनी सजविलेल्या वाहनामध्ये प्रसन्न मुद्रेने विराजमान माता सुदीक्षाजी यांच्या अतिविराट मिरवणुकीने संत निरंकारी समागम सोहळ्याचा शुभारंभ झाला.
चामरलेणीच्या पायथ्याजवळ असलेल्या बोरगड परिसरात शुक्र वारपासून (दि.२४) संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित ५३वा संत समागम सत्संग सुरू झाला आहे. सुमारे चारशे एकर जागेवर आयोजित या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशांतून लाखो भाविक डेरेदाखल झाले आहेत. निरंकारी संप्रदायाच्या प्रमुख माता सुदीक्षाजी यांच्या उपस्थितीत शुक्र वारी सकाळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध प्रदेशांतील भाविकांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कलांचे सादरीकरण करीत संत समागम सोहळ्याला प्रारंभ केला. डोळ्यांचे पारणे फेडणारी संस्कृतीची झलक दाखविणारी भाविकांची पथके शोभायात्रेत पुढे सरकत होती. ‘प्रेमाने बोला धन निरंकार’ असा जयघोष सतत होत होता. अशा भारावलेल्या वातावरणात लाखो भाविक सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर माता सुदीक्षाजींना एका फुलांनी सुसज्जित वाहनामध्ये विराजमान करण्यात आले. भक्तगण त्यांच्यासमोरून अभिवादन करीत, आशीर्वादाची कामना करीत पुढे सरकत होते. अखेरीस सत्संग समितीचे सदस्य, इतर मान्यवर व भक्तगण माताजींना सत्संगस्थळी मुख्य मंडपात घेऊन गेले. नंतर विविध धार्मिक कार्यक्र म झाले. दुपारी माता सुदीक्षाजींनी उपस्थित भाविकांचे स्वागत करून सर्वशक्तिमान ईश्वराला समजून घेण्याचा प्रयत्न आपण सत्संगातून करणार असल्याचे सांगितले.
भेदभावाच्या भिंती पाडण्याचे आवाहन
मानवी मनामध्ये उभ्या राहिलेल्या भेदभावाच्या भिंती पाडून प्रेमाचे पूल बांधावेत. इतरांचे मन दुखवण्यापेक्षा त्यांचे अश्रू पुसण्याचा भाव आमच्या मनामध्ये जागृत व्हायला हवा. आपल्यापरीने शक्य ते कार्य करून पीडितांचे अश्रू पुसण्याची भावना सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये मानवाला द्वेषाची नव्हे प्रेमाची गरज असल्याचे निरंकारी सद््गुरु माता सुदीक्षाजी यांनी त्यांच्या सत्संगात सांगितले.
शुक्र वारी ५३व्या वार्षिक निरंकारी संत सत्संगाचे उद्घाटन झाले. तेव्हा मानवतेच्या नावे संदेश देताना त्या बोलत होत्या. या संत समागमाला महाराष्टÑासह जवळपासची राज्ये, तसेच देशाच्या विविध प्रांतांतूनही लाखो भाविक सहभागी झाले आहेत. विदेशातूनही शेकडो प्रतिनिधी आले आहेत.