उद्यान सुशोभिकरण कामाचा शुभारंभ
By Admin | Updated: September 3, 2014 00:20 IST2014-09-02T22:22:02+5:302014-09-03T00:20:37+5:30
उद्यान सुशोभिकरण कामाचा शुभारंभ

उद्यान सुशोभिकरण कामाचा शुभारंभ
सिडको : उत्कर्ष हौसिंग सोसायटी आनंदवली येथे आमदार नितीन भोसले यांच्या ११.३० लक्ष इतक्या निधीतून उद्यान विकसित करून फुलझाडे लावणे, खेळणी बसविणे, बेंचेस, विद्युत व्यवस्था, संरक्षक भिंत बांधणे या कामांचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक एस.एस. देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी उत्कर्ष हौसिंग सोसायटीच्या वतीने आमदार नितीन भोसले यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक बी. एस. मोरे यांनी सांगितले की, उत्कर्ष हौसिंग सोसायटी ४५ वर्षांपासून उदयास आली असून, शासनाने या सोसायटीकरिता जागा उपलब्ध करून दिली होती. सोसायटीचे सभासद गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी उद्यान, ज्येष्ठांना बसण्यासाठी विरंगुळा सेंटर असावे, लहान मुलांना खेळणी, बेंचेस असावे या गोष्टींची आतुरतेने वाट बघत होते. या ठिकाणी आमची सोसायटी एकप्रकारे दुर्लक्षित झाली होती; परंतु आमदार नितीन भोसले यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी छानसे उद्यान होत आहे, याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे. कारण त्यानिमित्त का होईना आमच्या प्रश्नांना कोणीतरी साद दिली आहे.
आमदार नितीन भोसले यांनी सांगितले की, मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यात उद्याने, व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिक सभागृह, सामाजिक सभागृह, रस्ते, क्रीडांगण विकसित करणे, महिला व्यायामशाळा अशी विविध कामे सुरू आहेत. मी मागेल त्याला निधी उपलब्ध करून दिला आहे. पण काही ठिकाणी नगरसेवकांच्या विरोधामुळे चांगली कामे होत नाही. जनतेचा पैसा शासन त्याचे नियोजन कसे करायचे यासाठी लोकप्रतिनिधींना अधिकार देतात, मात्र नगरसेवकच चांगल्या कामाला विरोध करतात. परिणामी हा पैसा शासनाला परत जातो. जनतेची कामे होत नाही. काही ठिकाणी नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे कामे पूर्ण होऊ शकली नाहीत, अशीही उदाहरणे आहेत.
मतदारसंघात नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता विकासकामांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षाचे नगरसेवक असतील तिथेही निधी उपलब्ध करून देऊन विकासकामे केली आहेत. जवळपास १९ प्रभागात ३००च्या वर विकासकामे सुरू आहेत. नागरिकांनीही चांगल्या कामाला विरोध होत असेल तर वेळीच अशा नगरसेवकांना रोखले पाहिजे. मागील आर्थिक वर्षात सर्वात जास्त निधी खर्च करून विकासकामे मंजूर करून घेतली. याही वर्षी माझी एक कोटी २२ लाखांची कामे मंजूर असून, सर्वात जास्त निधी खर्च करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे, असेही शेवटी आमदार नितीन भोसले यांनी सांगितले. यानंतर ज्येष्ठ नागरिक ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी उत्कर्ष हौसिंग सोसायटीतील ए.एन. शेख, बी.एस. मोरे, एम. जी. पिसोळकर, ठाकरे, मेतकर, गवारे, श्रीमती नागरे, कुंभकर्ण, शेख, बोरसे, मोरे, पिसोळकर, देशमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (*वार्ताहर)