स्वर्गीय सरोदस्वरांनी सकाळ झाली सुरेल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2015 23:45 IST2015-12-20T23:42:29+5:302015-12-20T23:45:41+5:30
पार्थो सारथी : कलाविष्काराने रसिक थक्क

स्वर्गीय सरोदस्वरांनी सकाळ झाली सुरेल !
नाशिक : सरोदच्या तारांवर विजेच्या चपळाईने फिरणारी ‘त्यांची’ बोटे एकीकडे डोळ्यांना थक्क करीत असताना, सरोदमधून निघणारे सुरेल स्वर रसिकांच्या कानांना अद्भुत अनुभूती देत होते... या कलाविष्कारात अडीच-तीन तास कसे निघून गेले, हे ना मैफलीतल्या रसिकांना उमगले ना कलावंतांना...
‘मधुआनंद’ व शंकराचार्य न्यासाचा सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संगीतोत्सव’मध्ये शंकराचार्य संकुलात आज सकाळी सैनिया-मैहर घराण्यातील कोलकात्याचे प्रख्यात सरोदवादक पं. पार्थो सारथी यांचे सरोदवादन रंगले. पं. मधुसूदन कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालवयातच पं. सुधामय चौधरी यांच्याकडून, तर तरुणपणात उस्ताद ज्ञानेश खान यांच्याकडून सरोदवादनाची तालीम घेणाऱ्या पं. पार्थो सारथी यांनी आपल्या वादनाला राग अहिर ललतने सुरुवात केली. त्यात त्यांनी विलंबित गत, तर राग भूपाळतोडीत मध्यलयीतील गत पेश केली. त्यानंतर सादर झालेल्या राग परमेश्वरी, जोगिया कालिंगडा या रागांतील गत, झाला, आलापींना रसिकांनी दिलखुलास दाद दिली. आधी संथ, मग विलंबित लयीतील आलापींनी रसिकांना खिळवून ठेवले. भैरवीतील धूनने मैफलीची सांगता झाली. पं. सारथी यांना पं. योगेश समसी यांनी तबल्यावर साथ दिली. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.