अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध
By Admin | Updated: July 31, 2016 01:09 IST2016-07-31T01:05:06+5:302016-07-31T01:09:44+5:30
पोटनिवडणूक : हरकतींनंतर दुरुस्ती

अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध
नाशिक : नाशिकरोड येथील महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब) साठी येत्या २८ आॅगस्टला पोटनिवडणूक होत असून, दोन्ही प्रभागांमधील अंतिम मतदार याद्या शनिवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. प्राप्त पाच हरकतींवर सुनावणी होऊन मतदार याद्यांमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.
प्रभाग क्रमांक ३५ मधील मनसेच्या नगरसेवक शोभना शिंदे आणि प्रभाग क्रमांक ३६ मधील नगरसेवक नीलेश शेलार यांना पक्षविरोधी मतदान केल्याबद्दल विभागीय आयुक्तांनी मनसेच्या तक्रारीवरून अपात्र घोषित केले होते. त्यानुसार रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने दोन्ही प्रभागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. दि. २ आॅगस्टपासून नामनिर्देशनपत्र सादर होणार आहेत. तत्पूर्वी, महापालिकेने दोन्ही प्रभागांसाठी दि. १६ जुलै रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली होती आणि त्यावर दि. २३ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. मुदतीत पाच हरकती प्राप्त झाल्या. प्रभाग क्रमांक ३५ मध्ये १४३ तर प्रभाग ३६ मध्ये ३४६ आडनावांचा घोळ आढळून आला होता. त्यानुसार प्रशासनाने त्यात दुरुस्त्या केल्या आहेत. तसेच पुरवणी यादीतही प्रभाग क्रमांक ३५ मध्ये ३१ नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. सदर अंतिम याद्या या महापालिकेच्या नाशिकरोड येथील विभागीय कार्यालय आणि राजीव गांधी भवन येथे मुख्यालयात पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)