प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: September 7, 2016 00:48 IST2016-09-07T00:48:10+5:302016-09-07T00:48:19+5:30

आज होणार सादर : त्रिस्तरीय समिती करणार तपासणी

Last phase of the format ward structure | प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्प्यात

प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्प्यात

नाशिक : फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव बुधवारी (दि.७) विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीला सादर होणार आहे. सदर समिती प्रस्तावाची तपासणी करून तो मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे रवाना करणार आहे. प्रभाग रचनेकडे सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीही स्थापन करण्यात आली आहे. रात्रंदिवस सदर रचना तयार करण्याचे काम नगररचना विभागाकडून केले जात आहे. त्यात प्रामुख्याने, प्रगणक गटांच्या सीमा हिरव्या रंगाने, जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने, तर नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शविण्यात येत आहेत. प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार करण्यात येत असून, त्यांच्या हद्दीबाबतही स्पष्टता करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागामध्ये समाविष्ट झालेले प्रगणक गट व नकाशानुसार त्या प्रभागामध्ये समाविष्ट होणारे प्रगणक गट एकच आहेत याबाबतचीही खात्री करून घेतली जात आहे.
२०११च्या जनगणनेनुसार तयार करण्यात येणाऱ्या या प्रभाग रचनेत एकूण ३१ प्रभाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात २९ प्रभागातील सदस्यसंख्या चार, तर दोन प्रभागांची सदस्य संख्या प्रत्येकी तीन असण्याची शक्यता आहे. नगररचना विभागाच्या अभियंत्यांमार्फत गुगलवरून तसेच उपलब्ध नकाशांवरून प्रारूप प्रभाग रचनेचे काम दिवस-रात्र सुरू आहे. महापालिका आयुक्तांकडून त्याबाबत दैनंदिन आढावा घेतला जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि.७) प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीकडे सादर केला जाणार असून, समिती राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रस्ताव योग्य झाला आहे किंवा नाही, याची तपासणी करणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने विहित केलेल्या प्रमाणपत्रासह समिती आयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव रवाना करणार आहे. प्रभाग रचना नेमकी कशी होते, याकडे आता सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून असून, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडते याचीही उत्सुकता ताणली गेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Last phase of the format ward structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.