अखेर शुभारंभ : उद्या दुसऱ्यांदा गाठणार शारजा

By Admin | Updated: July 24, 2016 01:08 IST2016-07-23T23:51:01+5:302016-07-24T01:08:07+5:30

कार्गोसेवेने शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

LAST LAST: Sharjah will be going out tomorrow | अखेर शुभारंभ : उद्या दुसऱ्यांदा गाठणार शारजा

अखेर शुभारंभ : उद्या दुसऱ्यांदा गाठणार शारजा

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या ओझर येथील कार्गोसेवेला अखेर मुहूर्त लागला आहे. कृषी उत्पादनांसाठी व विशेषत: जिल्ह्यातील कांदा व द्राक्षासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी नाशिकमधील शेळ्या आणि मेंढ्या थेट दुबईत पाठविण्यासाठी तिचा उपयोग सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात प्रथमच झालेल्या या निर्यातीसाठी ओझर येथील हॉल्कॉनच्या कार्गोसेवेचा वापर करण्यात आला असून, आता येत्या सोमवारी (दि.२५) सकाळी सुमारे १८०० जिवंत शेळ्या- मेंढ्याना घेऊन कार्गो फ्लाईट शारजाला रवाना होणार आहे.
नाशिकमध्ये एचएएलच्या मदतीने विमानतळाच्या जवळच हॉल्कॉनचा कार्गो प्रकल्प आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेती मालाला चालना मिळावी, यासाठी तो साकारला असला तरी गेल्या सहा वर्षांत त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. मात्र, नाशिकच्याच सानप अ‍ॅग्रोनिमल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हेमंत सानप यांनी अ‍ॅमीगो लॉजिस्टीक या कंपनीच्या माध्यमातून गेल्या १५ जुलैला ९३२ शेळ्या आणि ६३६ मेंढ्या अशा १६६८ जनावरांची निर्यात केली आहे. आता सोमवारी (दि.२५) १८०० शेळ्या आणि मेंढ्यांची याच कंपनीच्या माध्यमातून निर्यात केली जाणार आहे.
हेमंत सानप हे तसे अनेक वर्षांपासून द्राक्ष, डाळिंब आणि फळे विदेशात निर्यात करतात. त्याचबरोबर त्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आणि शेळी आणि मेंढ्यांची विदेशात निर्यात करण्याचे ठरविले. समुद्रमार्गे जिवंत जनावरांची वाहतूक करणे सोपे असले तरी पावसाळ्यात ते शक्य नसते. साहजिकच, दुबईत मागणी असलेली जनावरे पोहोचत नसल्याने या कालावधीत मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे मालवाहू विमानातून जनावरे पाठविण्याचा विचार सानप यांनी केला. त्यांना अ‍ॅमीगो लॉजिस्टीकची साथ मिळाली. त्यांनी नाशिकच्या ओझरमधील विमानतळावरून ही सेवा सुरू करण्यासाठी सर्व प्रकारच्या तांत्रिक परवानग्या आणण्याचे काम केलेच, शिवाय शेळ्या आणि मेंढ्यांची चोवीस तास अगोदर तपासणी करण्याची व्यवस्थाही नाशिकमध्येच उपलब्ध करून दिली. त्यासाठी खास मुंबईहून वैद्यकीय पथक नाशिकला आणण्यात आले होते.
आता सोमवारी आणखी १८०० शेळ्या व मेंढ्या पाठविण्यात येणार असून, या व्यतिरिक्त निर्यातीचे पाच शेड्युल्ड मिळाले असल्याचे सानप यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकमधून कार्गाेसेवेला अधिकच चालना मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: LAST LAST: Sharjah will be going out tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.