अखेरच्या दिवशी ८० अर्ज दाखल
By Admin | Updated: January 19, 2016 22:57 IST2016-01-19T22:38:58+5:302016-01-19T22:57:30+5:30
उमराणे बाजार समिती

अखेरच्या दिवशी ८० अर्ज दाखल
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१६-२१ या पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले असून, सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व माथाडी गटातून तब्बल ८० अर्ज दाखल आहेत.
यात सोसायटी गटातून ३९ अर्ज दाखल करण्यात आले असून जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे, विलास देवरे आदिंसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, तिसगाव, वऱ्हाळे, चिंचवे, खारीपाडा आदि गावांतील चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालकांनी अर्ज दाखल केले आहे. ग्रामपंचायत गटातून २३ अर्ज दाखल झाले.
उमराण्याच्या सरपंच सोनाली देवरे, शिवसेना तालुकाप्रमुख देवानंद वाघ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पुंडलिक देवरे आदिंसह कार्यक्षेत्रातील आठ गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. व्यापारी व आडते गटासाठी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण पोपटलाल, सचिव सुनील दत्तू देवरे व सहसचिव संजय खंडेराव देवरे आदिंसह १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर हमाल व मापारी गटातून चार उमेदवारी अर्ज दाखल आहेत.
दरम्यान, १८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सोसायटी गटासाठी १००, ग्रामपंचायत गटासाठी ८०, व्यापारी व आडते गटासाठी २५८, तर माथाडी गटासाठी १२९ मतदार आहेत. सोसायटी गटातील चिंचवे येथील प्रकाश पवार व गणेश गांगुर्डे यांची मतदार यादीतून नावे वगळण्यात आली आहेत. (वार्ताहर)
गाठ पॅकिंगची मजुरी वाढवून देण्याची मागणी
मालेगाव : शहर व परिसरात गाठ पॅकिंगची मजुरी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शासकीय कामगार अधिकाऱ्यांकडे मालेगाव गाठ पॅकिंग वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अन्वरखान समशेरखान व सचिव अकबर खान दौलतखान यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या कामगारांना सध्या प्रत्येक गाठीमागे १२ रुपये मिळतात. या दरात महागाईमुळे गुजराण करणे अवघड आहे. या दरात गेल्या दोन ते तीन वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या दरात किमान
८ रुपयांनी वाढ करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)