२२ महिन्यांत सव्वा लाखाच्या बनावट नोटा
By Admin | Updated: December 24, 2016 01:10 IST2016-12-24T01:09:50+5:302016-12-24T01:10:10+5:30
नाशकात २१ गुन्हे दाखल : बँकांमधील प्रकार

२२ महिन्यांत सव्वा लाखाच्या बनावट नोटा
विजय मोरे नाशिक
अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात आलेल्या बनावट नोटा, अमली पदार्थांची खरेदी-विक्री तसेच भ्रष्टाचार यामुळे एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री जाहीर केला़ पंतप्रधानांच्या तीन मुद्द्यांपैकी बनावट नोटा या एका मुद्द्याचा विचार करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सात पोलीस ठाण्यांमध्ये २१ गुन्हे दाखल असून, बनावट नोटांची किंमत एक लाख १९ हजार ५० रुपये आहे़
शत्रूराष्ट्राकडून प्रतिस्पर्धी देशाची प्रगती रोखण्यासाठी अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे प्रयत्न केले जातात़ त्यासाठी प्रामुख्याने बनावट नोटांचा वापर केला जातो़ भारतीय चलनातही बनावट नोटांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याने पंतप्रधानांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला़ शहर पोलीस आयुक्तालयाचा विचार करता १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत १६, तर १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर २०१६ या दहा महिन्यांच्या कालावधीत पाच असे २१ बनावट नोटांचे गुन्हे शहरातील सात पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत़
पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाण्यात सर्वाधिक आठ गुन्ह्यांची नोंद असून, नव्याने झालेल्या म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
राष्ट्रीयीकृत बँकांची प्रमुख कार्यालये तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय नागरिकांची संख्या सातपूर परिसरात अधिक आहे़ शहर तसेच जिल्ह्यातील बँकांमध्ये ग्राहकांनी भरणा केलेल्या नोटांमध्ये बनावट नोटा असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो़ शहरात साधारणत: दर महिन्याला एक बनावट नोटेचा भरणा केला जात असल्याचे दिसून येते़