लासलगावी कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:01 IST2021-04-06T23:18:23+5:302021-04-07T01:01:32+5:30
लासलगाव: निफाड तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार धुमाकूळ घातल्याने आरोग्य व महसूल यंत्रणा गतिमान झाली असून मंगळवारी सकाळपासून दुकाने कडकडीत बंद असल्याने लॉकडाऊनची प्रचिती आली.

लासलगावी कडकडीत बंद
लासलगाव: निफाड तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार धुमाकूळ घातल्याने आरोग्य व महसूल यंत्रणा गतिमान झाली असून मंगळवारी सकाळपासून दुकाने कडकडीत बंद असल्याने लॉकडाऊनची प्रचिती आली.
एरवी कांदा व्यापाराने गजबजलेले असणाऱ्या लासलगावमध्ये आज बंदमुळे शुकशुकाट दिसून आला. आज लासलगावी कांदा लिलावात कोरोना उपाययोजना करीत लिलाव सुरू होते. कालच सरपंच जयदत्त होळकर, ज्येष्ठ सदस्य नानासाहेब पाटील, उपसरपंच अफजलभाई शेख, सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने व व्यवहार बंद असल्याचे दिसून आले.
निफाड तालुक्यातील दोन्ही कोविड उपचार केंद्रात रुग्णांची संख्या वाढल्यामुळे बेड्स पूर्ण झाले आहेत. दररोज तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी संसर्ग होऊ नये यासाठी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, असे आवाहन निफाड तालुका गटविकास अधिकारी संदीप कराड व कोरोना संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी केले आहे.
निफाड तालुक्यातील सध्या १,८२८ रुग्ण असून निफाड तालुका पहिल्या क्रमांकावर आहे.
निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे यांनी तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्यासह अधिकाऱ्यांनी बेफिकिरी दाखविणाऱ्या नागरिकांना व दुकान मालकांना दंड केल्याने त्याचा परिणाम निफाड तालुक्यातील विविध गावात झाला आहे.
दरम्यान, आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १०९ वाहनातून उन्हाळ कांद्याची आवक अंदाजे २०५० क्विंटल होती तर १,०३२ वाहनातील लाल कांद्याची आवक अंदाजे १५,४०० क्विंटल होती. उन्हाळ कांदा किमान ७५१, कमाल १,१३१ व सरासरी १,००१ रुपये तर
लाल कांदा किमान ३०० ते कमाल ९७० व सरासरी ७५१ रुपयांपर्यंत भाव होते.