साठेबाजी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:55 IST2020-04-13T23:55:25+5:302020-04-13T23:55:37+5:30
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून किमती वाढविल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, त्या तक्रारींची दखल घेऊन राज्यात पथके गठित करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

साठेबाजी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके
नाशिक : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून किमती वाढविल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, त्या तक्रारींची दखल घेऊन राज्यात पथके गठित करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नसून किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार व अतिरिक्त भाववाढ केली जात आहे. राज्याच्या वैधमापन शास्त्र विभागाने जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी व भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथके तयार केली आहेत. ही पथके किरकोळ तसेच घाऊक व्यापार प्रतिष्ठाने, गुदामे, शीतगृहे इत्यादी ठिकाणी असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता व दरांची पडताळणी करून कारवाई करणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. याबाबत पुरवठा विभागासोबतच महसूल विभाग आणि वैधमापनशास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.