मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा
By Admin | Updated: July 24, 2016 22:56 IST2016-07-24T22:52:43+5:302016-07-24T22:56:28+5:30
मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा

मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा
द्याने : द्यानेसह मोसम नदीपात्रातून रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असून, रात्री व पहाटेच्या वेळेला वाळू चोरी केली जाते. पोलीस प्रशासन व महसूल विभाग कारवाई करतात व दंडाची रक्कम वाळूमाफिया एका रात्रीतून वसूल करतात. आगामी काळात जलसाठा व भूजल पातळी घटून शेतीसिंचनासह तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याचा प्रसंग मोसम खोऱ्यातील शेतकरी व जनतेवर येण्याची भीती व्यक्त होत आहे.
मोसम नदी बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या काठांवर मोठ्या प्रमाणात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. त्या विहिरींच्या काही फुटाच्या अंतरावर अवैध वाळू उपसण्याचा गंभीर प्रकार राजरोस सुरू असतानाही महसूल यंत्रणेचे डोळे बंद का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नामपूर शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. मोसम परिसरात आत्ताच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक भागात विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येने अनेक ठिकाणी डोके वर काढले आहे. पाण्याच्या या गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी मोसम नदीचे आवर्तन हाच एकमेव मार्ग आहे. या आवर्तनाचा फायदा नदीकाठच्या गावांना व पाणीपुरवठा योजनांना होतो. परंतु खुलेआम वाळू उपशामुळे मोसम नदीची वाट लागली असून, नदीत पडलेल्या दहा ते पंधरा फुटांच्या खड्ड्यांमुळे विहिरींची पाण्याची पातळी घटत चालली आहे. नदीपात्रातील वाळू उपसा असाच सुरू राहिल्यास आगामी काळात गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ सर्वांवर येणार आहे. कारण यावर्षीही पावसाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासुन नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. त्यास शेतकरी व ग्रामस्थांनी वारंवार विरोध करूनही पुन्हा वाळूचा उपसा अवैधरित्या चढ्या दराने राजरोसपणे होत आहे.
हा प्रकार प्रशासनापासुन लपलेला नाही. हे सर्व माहीत असताना प्रशासकीय कर्मचारी या उपशाविरुद्ध कडक कारवाई करीत नसल्याने त्यांची मूकसंमती असल्याचे म्हटले जात आहे. शासकीय विकासकामे करण्याच्या नावाखालीही वाळूचा प्रचंड उपसा होत आहे. वास्तविक ठेकेदार निविदा भरताना शासकीय दराने वाळूचे दर निविदेत सादर करतो.
तरीही अनधिकृतपणे नदीपात्रातील वाळू शासकीय कामासाठी वापरून शासनाची फसवणूक केली जाते. मात्र वाळू उपसा थांबविण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची चांदी झाली आहे. महसूल विभाग व वडनेर खाकुर्डी, जायखेडा पोलीस प्रशासनाने रात्री गस्त घालून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्ग व नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)