अशोकनगर विद्यालयास लावले कुलूप
By Admin | Updated: May 20, 2017 01:52 IST2017-05-20T01:52:01+5:302017-05-20T01:52:10+5:30
राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटीच्या संतप्त संचालकांनी अशोकनगर येथील आदिवासी सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयास टाळे ठोकले आहे.

अशोकनगर विद्यालयास लावले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : मागील करार संपुष्टात येऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला तरी नवीन करार करीत, भाडेवाढ करीत नाही आणि जागा खालीही करून देत नाही म्हणून राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटीच्या संतप्त संचालकांनी अशोकनगर येथील आदिवासी सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयास टाळे ठोकले आहे.
अशोकनगर येथील राज्यकर्मचारी हौसिंग सोसायटीच्या जागेवर १९९६ पासून आदिवासी सेवा समिती संचिलत अशोकनगर माध्यमिक विद्यालय भाडेतत्त्वावर आहे. गेल्या अडीच वर्षांपासून (एप्रिल २०१४ पासून) या शैक्षणिक संस्थाचालकांनी नवीन भाडेवाढीचा करार केलेला नाही. भाडेवाढ करीत नाही. म्हणून वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र संस्थाचालकांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. याबाबत सोसायटीच्या २८ आॅगस्ट २०१६ रोजी सर्वसाधारण सभेत इमारत खाली करून घेण्याचा ठराव संमत केला होता.या ठरावाची प्रत संस्थेला देण्यात आली होती. तरीही संस्थाचालकांनी दुर्लक्ष केले म्हणून आज सोसायटीच्या संचालकांनी ठरावाची अंमलबजावणी करीत विद्यालयाला कुलूप ठोकले आहे.यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अशोक रउंदळ, सेक्रे टरी बी.आर.शिंदे, खजिनदार एम. पी. पंडित, तसेच प्रकाश तांबट, बाळासाहेब भोजने, लखुजी महाजन, निशीकांत तायडे, आर.एम.वाकचौरे, सुधाकर भंदुरे आदिंसह संचालक उपस्थित होते.