लाखोंची फसवणूक; चौघांना कोठडी
By Admin | Updated: January 10, 2017 01:25 IST2017-01-10T01:25:42+5:302017-01-10T01:25:55+5:30
नोकरीचे आमिष : ‘आदिवासी विकास’चे बनावट शिक्के, मोटार जप्त

लाखोंची फसवणूक; चौघांना कोठडी
नाशिक : प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून एका बेरोजगार युवकाला सुमारे साडेदहा लाखांना गंडा घालणाऱ्या चौघा भामट्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीसह बनावट शिक्के व कागदपत्रे जप्त केली आहेत.
नाशिकच्या आदिवासी विकास विभागाचे बनावट संकेतस्थळ व शिक्के तयार करून त्याद्वारे बेरोजगार युवकांना नोकरीचे नियुक्तिपत्र देत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.७) पर्दाफाश केला आहे. बनावट संकेतस्थळ विकसित करणारा संशयित उदयनाथ श्याम नारायण सिंग (रा. भार्इंदर, ठाणे) यास पोलिसांनी रविवारी अटक केली. हेमंत सीताराम पाटील (३१), सुरेश गोकुळ पाटील (३४, दोघेही रा. धुळे), तुकाराम रामसिंग पवार (५६, रा. जळगाव) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारीच अटक केली आहे. या चौघा संशयित आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत (दि.१२) पोलीस कोठडी सुनावली आहे. या भामट्यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी संदीप कौतिक पाटील (२६) यास नोकरीचे आमिष दाखवून सतरा लाखांची मागणी केली. पाटील याच्या वडिलांकडून वेळोवेळी पैसे घेत एकूण साडेदहा लाख रुपये उकळले व उरलेल्या साडेसहा लाख रुपयांसाठी भामट्यांनी बनावट शिक्क्याचा वापर व स्वाक्षरी करत फिर्यादीला नोकरीचे शासकीय नियुक्तिपत्रही दिले होते. बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एकूण दहा ते बारा संशयितांची टोळी असून, चौघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. (प्रतिनिधी)