राज्यात आजपासून ‘लेक शिकवा’ अभियान
By Admin | Updated: January 2, 2017 23:10 IST2017-01-02T23:09:47+5:302017-01-02T23:10:07+5:30
शासनाचे शाळांना परिपत्रक : २६ जानेवारीपर्यंत राबविणार विविध शैक्षणिक उपक्रम

राज्यात आजपासून ‘लेक शिकवा’ अभियान
पेठ :विद्या हे धन आहे रे,
श्रेष्ठ साऱ्या धनाहून,
तिचा साठा ज्यापाशी,
तोच खरा धनवान
वरील काव्यपंक्तीत विद्येचे महत्त्व सांगून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून (दि. ३) राज्यात ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी व परंपरांच्या जाळ्यात गुरफटलेल्या समाजात स्त्रीला तुच्छ व भोगवस्तू म्हणून पाहिले जात होते. अशा परिस्थितीत समाजाचा रोष पत्करून स्त्रियांना चूल व मूल यांच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी सावित्रीबार्इंनी प्रयत्न सुरू केले. पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी या चळवळीचा पाया रचला. आजच्या विद्यार्थी व समाजाला सावित्रीबार्इंच्या सामाजिक कार्याची आवड व प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्याचा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. मुलींच्या शिक्षणात खंड न पडणे, शिक्षणाला प्रतिष्ठा व अधिष्ठान प्राप्त करून देणे, स्थलांतरित मुलींच्या शिक्षणासाठी उपाययोजना राबविणे यासाठी या अभियानात विविध उपक्र म राबविण्यात येणार आहेत. ३ जानेवारी रोजी ग्रंथदिंडी काढून सावित्रीबार्इंना अभिवादन करण्यात यावे, अभियान काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन व वाचन, वक्तृत्व स्पर्धा, वाचन प्रेरणा, माता व किशोरवयीन मुलींचे मेळावे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)