स्वाइन फ्लू जनजागृतीचा अभाव
By Admin | Updated: March 3, 2015 00:38 IST2015-03-03T00:37:57+5:302015-03-03T00:38:12+5:30
उदासीनता : आरोेग्य विभाग, महापालिकेचेही दुर्लक्ष; रुग्ण संख्येत होतेय वाढ

स्वाइन फ्लू जनजागृतीचा अभाव
नाशिक : दमट हवामान, ढगाळ वातावरण व अवकाळी पावसावर स्वाइन फ्लूच्या उद्रेकाचे खापर फोडून मोकळे होणाऱ्या आरोग्य विभागाने अशा वातावरणातही स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यास टाळाटाळ चालविल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ व त्याचबरोबर बळींचा आकडाही फुगत चालला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातही झपाट्याने स्वाइन फ्लूचा फैलाव होत असून, त्याला आळा घालण्यासाठी औषधोपचाराबरोबरच जनजागृतीही तितकीच गरजेची आहे. परंतु जनजागृतीअभावीच स्वाइन फ्लूचा उपद्रव वाढत चालल्याचे आत्तापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येवरून स्पष्ट झालेले आहे. विशेष करून स्वाइन फ्लूने बळी घेतलेल्यांमध्ये वयस्कर महिलांचाच समावेश अधिक असल्यामुळे त्यांनी यापासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत शहरी व ग्रामीण भागातही अनभिज्ञता आहे. त्यामुळे सर्दी-खोकला, ताप यासारखे लक्षणे दिसू लागताच, त्याला स्वाइन फ्लूची जोड देऊन जनतेत घबराट निर्माण केली जात आहे.
दरवर्षीच प्रादुर्भाव होणाऱ्या स्वाइन फ्लूने अनेकांचे बळी घेतले असले तरी, त्याला प्रतिबंध करण्यासाठी ठोस वैद्यकीय उपचार अथवा लस नाही, स्वाइन फ्लूसदृश अथवा रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्यानंतरच त्याच्यावर उपचार केले जात असल्याने तत्पूर्वी त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य विभागाकडून कोणतेच मार्गदर्शन होत नाही. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे स्वाइन फ्लूचा फैलाव झाल्यावर आरोग्य विभागाने महाविद्यालये, शाळा, स्वयंसेवी संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या मदतीने स्वाइन फ्लूपासून दूर राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती चळवळ हाती घेतली होती, परिणामी जनतेतही जागृती होऊन तोंडाला ‘मास्क’ लावूनच प्रत्येक व्यक्ती वावरत होती, तर समाजानेही मोठ्या मनाने ठिकठिकाणी मोफत मास्क वाटप करून हातभार लावला होता. जिल्हा परिषद, महापालिकेनेही ठिकठिकाणी फलक लावून काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शन केल्याने स्वाइन फ्लूच्या फैलावास अटकाव बसण्यास मोठी मदत झाली होती. आता मात्र संपूर्ण आरोग्य विभागच सुस्त झाला असून, ना जागृती ना मार्गदर्शन अशी सध्याची अवस्था आहे. परिणामी प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, त्यातून बळी जाण्याचे प्रमाणही अधिक आहे. (प्रतिनिधी)