लासलगावला बोर फळविक्रीला सुरुवात
By Admin | Updated: November 24, 2015 23:26 IST2015-11-24T23:26:13+5:302015-11-24T23:26:44+5:30
लासलगावला बोर फळविक्रीला सुरुवात

लासलगावला बोर फळविक्रीला सुरुवात
लासलगाव : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात धान्य, टमाटा, भाजीपाला, डाळींब व पपई पाठोपाठ बोर या शेतमालाची आवक झाल्याने फळे विक्रीसाठी ही बाजारपेठ नावारूपास येत असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी दिली.
लासलगाव बाजार आवारात रविवारी पंढरपूर, जि. सोलापूर येथील शेतकरी तानाजी उत्तम येनारेकर यांनी बोरांच्या १४५ गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. बाजार समितीत टिंभरी या जातीच्या बोरांची आवक झाल्याने डाळींब खरेदीदारांनी बोरांचा स्वतंत्रपणे लिलाव केला.
लासलगाव टमाटा व्हेजिटेबल अॅण्ड फ्रुट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते बोरांच्या गोणीचे पूजन करण्यात येऊन लिलाव पुकारण्यात आला. मदीना फ्रुट अॅण्ड व्हेजिटेबल कंपनीच्या आडतीत मोहसीन शेख या खरेदीदाराने २० रुपये किलो या दराने खरेदी केली.
याप्रसंगी फळे खरेदीदार मोहसीन शेख, इम्रान शेख, मनोज माठा, मनोज गोरडे, नंदकिशोर व्यास, शादाब शेख, मधुकर गावडे, सुनील शिंदे, विजय शेटे, बबलू पाशा यांच्यासह कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)