‘एल अॅण्ड टी’चा मनपाला अल्टीमेटम
By Admin | Updated: September 21, 2015 23:53 IST2015-09-21T23:53:00+5:302015-09-21T23:53:54+5:30
मुकणे पाणीपुरवठा : ३० तारखेपर्यंत निर्णय घेण्याचे पत्र

‘एल अॅण्ड टी’चा मनपाला अल्टीमेटम
नाशिक : महापालिकेमार्फत केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेवरील स्थगिती शासनाने महिनाभरापूर्वी उठविल्यानंतरही भिजत घोंगडे पडल्याने अखेर न्यूनतम निविदाधारक एल अॅण्ड टी कंपनीने महापालिकेला पत्र देऊन ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या अन्यथा वैधता कालावधी वाढवून देणे शक्य नसल्याचा अल्टीमेटम दिला आहे. कंपनीच्या या भूमिकेमुळे प्रशासनाकडूनही आता दबाव वाढला असून, महासभेला कोणत्याही स्थितीत येत्या आठ दिवसांत त्यावर अंतिम निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेच्या निविदाप्रक्रियेत झालेल्या अनियमिततेबाबत आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह काही नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींनंतर नगरविकास विभागाने राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये निविदा प्रक्रियेला दि. १८ मे २०१५ रोजी तात्पुरती स्थगिती दिली होती. मूळ निविदांच्या अटी-शर्तींमध्ये बदल करण्यात आल्याने महापालिकेचे नुकसान होणार असल्याची आणि निविदाप्रक्रिया राबविताना शासकीय नियमावलीचा भंग झाल्याची तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, त्यावर मंत्रालयात दोनदा बैठका होऊन नगरविकास विभागाने अखेर २० आॅगस्ट २०१५ रोजी काही अटी-शर्तींवर स्थगिती उठविली.