जन्म बापास देते नवा पोरगी़़़ ‘कुसुमाग्रज स्मरण’ कार्यक्रम : कवींचे सामाजिक विषयावर परखड भाष्य
By Admin | Updated: March 8, 2015 01:00 IST2015-03-08T00:59:42+5:302015-03-08T01:00:05+5:30
जन्म बापास देते नवा पोरगी़़़ ‘कुसुमाग्रज स्मरण’ कार्यक्रम : कवींचे सामाजिक विषयावर परखड भाष्य

जन्म बापास देते नवा पोरगी़़़ ‘कुसुमाग्रज स्मरण’ कार्यक्रम : कवींचे सामाजिक विषयावर परखड भाष्य
नाशिक : ‘जन्म बापास देते नवा पोरगी, देश घडवावया वाचवा पोरगी, ओल हृदयातली, वीज गगणातली, एैन ग्रीष्मातला गारवा पोरगी’ असे स्त्रीशक्तीची विविध रूपे गौरवकुमार आठवले या कवीने प्रेक्षकांसमोर सादर केले़ निमित्त होते कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमानिमित्त आयोजित निमंत्रित कवींच्या कवितांचे़ कवी नारायण कुलकर्णी-कवठेकर, दासु वैद्य, भरत दौंडकर यांनी सादर केलेल्या कवितांना प्रेक्षकांनी विशेष दाद दिली़ जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या कार्यक्रमात गझलकार आठवले यांनी ‘काळ हा नाही तुझ्यासाठी बरा बाई, संस्कृतीला दे नव्याने हादरा बाई, तू घडविले चेहरे अगणीत पुरुषांचे, अन् स्वत:चा तू हरविला चेहरा बाई’ असे वर्णन करून महिलांचा मोठेपणा, त्यांचे कष्ट अन् त्यामध्ये त्या स्वत:ची विसरलेली ओळख सादर केली़ कवी भरत दौंडकर यांनी घुंगरू, भटकी शाळा या कविता सादर केल्या़ त्यांनी सादर केलेली ‘गुंठा गुंठा जमीन विकून, आज गोफ आली गळ्यात, एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात’ यास विशेष दाद मिळाली़ कवी दासू वैद्य यांनी ‘ऐकत राहतो, मुलगी मोठी झाली, चांगला गाढ झोपलो होतो, नवी प्रार्थना’ या कविता सादर केल्या, तर कवठेकरांनी नंदीबैल ही कविता सादर केली़ यावेळी कवींनी दारू तयार करणाऱ्या महिलेच्या मनातील व्यथा ‘आईच्या मनात उभी बाटली आडवी करायची खूप इच्छा होती, पण काळजातली दारूभट्टी उद््ध्वस्त करता-करता ती स्वत:च उद््ध्वस्त झाली’ ही कवितेतून सादर केली़ कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी नारायण कुलकर्णी - कवठेकर यांनी केले. प्रास्ताविक व आभार कवी किशोर पाठक यांनी मानले़(प्रतिनिधी)