कन्नड साहित्यिक शिवप्रकाश यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार

By Admin | Updated: June 7, 2017 00:07 IST2017-06-07T00:07:02+5:302017-06-07T00:07:12+5:30

मुक्त विद्यापीठाची घोषणा : १५ जून रोजी होणार वितरण

Kusumagraj National Award for Kannada literary Shivprakash | कन्नड साहित्यिक शिवप्रकाश यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार

कन्नड साहित्यिक शिवप्रकाश यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ कन्नड साहित्यिक प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार लातूरच्या मेनका धुमाळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी मंगळवारी पुरस्कारांची घोषणा केली. यंदाचा हा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार असून, एक लाख रु पये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे.
डॉ. शिवप्रकाश यांचे इंग्रजी आणि कन्नड या भाषांतील साहित्यात मोठे योगदान आहे. त्यांनी नऊ काव्यसंग्रह संपादित केले असून, पंधरा नाटकांचे लेखन केले आहे. त्यांच्या कवितांचे भारतीय आणि युरोपीय भाषांत अनुवाद, अनेक देशी-विदेशी नियतकालिकांतून साहित्य प्रकाशित झालेले आहे. वाङ्मयीन व नाट्यविषयक चर्चासत्रांचे देशभर आयोजन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. साहित्य अकादमीच्या ‘इंडियन लिटरेचर’ या नियतकालिकाचे अनेक वर्ष संपादनही केले. देश-विदेशात चर्चासत्रांच्या माध्यमातून कन्नड साहित्याचा प्रचार करण्याचे त्यांचे कार्य मोलाचे आहे.
त्याचबरोबरच विद्यापीठातर्फे दिला जाणारा २०१६ या वर्षाचा बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार लातूर येथील नवोदित कथा लेखक मेनका बाबुराव धुमाळे यांना त्यांच्या ‘कोरडा पाऊस’ या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. धुमाळे या जिजामाता कन्या प्रशाला, लातूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. येत्या १५ जून रोजी मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीत सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरणाचा सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्र मास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे.
 

Web Title: Kusumagraj National Award for Kannada literary Shivprakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.