कुशावर्ताला रामकुंडाचा पर्याय
By Admin | Updated: September 25, 2015 22:48 IST2015-09-25T22:47:25+5:302015-09-25T22:48:40+5:30
भाविकांचा नाशिककडे ओघ

कुशावर्ताला रामकुंडाचा पर्याय
नाशिक/पंचवटी : त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या व अखेरच्या पर्वणीला देशभरातील भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांना कुशावर्ताऐवजी रामकुंडावरच स्नान करावे लागले. त्यामुळे नाशिकचा गोदाघाटही भाविकांनी फुलून गेला होता. दिवसभरात हजारो भाविकांनी पवित्र स्नान करीत पुण्य पदरी पाडून घेतले. यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील नाशिकमधील तिन्ही पर्वण्या आटोपल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडत त्र्यंबकेश्वर येथील अखेरच्या पर्वणीवर लक्ष केंद्रित केले होते; मात्र शुक्रवारी भाविकांनी पोलिसांचा अंदाज चुकवत त्र्यंबकेश्वर येथे विक्रमी संख्येने हजेरी लावली. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन कोलमडले. त्र्यंबकमध्ये भाविकांचा ओघ प्रचंड वाढल्याने तिकडे जाणारी वाहतूक अनेकदा बंद ठेवावी लागली. भाविकांना दहा ते पंधरा किलोमीटर पायपीट करून त्र्यंबकमध्ये पोहोचावे लागत होते. त्यातच त्र्यंबकमध्ये गर्दीचा वाढता ओघ लक्षात घेता, भाविकांनी कुशावर्ताऐवजी रामकुंडावरच स्नान करावे, अशी सूचनाही प्रशासनाच्या वतीने केली जात होती. त्यामुळे गर्दीमुळे होणाऱ्या संभाव्य हालअपेष्टा लक्षात घेऊन अनेक भाविकांनी आपला मोर्चा रामकुंडाकडे वळवला. अखेरची पर्वणी त्र्यंबकमध्ये असली, तरी पहाटे पाच वाजेपासूनच रामकुंडावरही भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी दहा वाजेपर्यंत गर्दी काहीशी ओसरली; मात्र त्र्यंबकेश्वरकडे जाणारे रस्ते बंद केल्याने दुपारी १२ नंतर रामकुंडावर गर्दी वाढू लागली. रामकुंडाकडे जाणाऱ्या तसेच गोदाघाट परिसरातील रस्त्यांवर बॅरिकेडिंग करून ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. रामकुंडात स्नान झाल्यानंतर श्री कपालेश्वर मंदिर, श्री नारोशंकर मंदिर, श्री गंगा गोदावरी मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.