नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला जे काही करायचे ते होते आहे. कुंभमेळा हा काही एकट्या नाशिक शहराचा विषय नाही आणि महापालिकेचीही जबाबदारी नाही. देशात दोन ठिकाणी कुंभमेळा होत असताना केंद्र व राज्य सरकारनेच त्यासाठी निधी दिला पाहिजे. महापालिका कर्ज काढून किती गोष्टी करणार आणि पैसे आणायचे कोठून, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिकपणे संवाद साधला. ठाकरे म्हणाले, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारने कुंभमेळ्यासाठी निधी द्यायचा आणि त्याची केवळ अंमलबजावणी महापालिकेने करायची; परंतु केंद्र व राज्य सरकारकडून अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यामुळे कामांसाठी लागणाऱ्या पैशांचे ओझे शहरावर पडणार आणि महापालिका ते नागरिकांवर टाकणार. यामध्ये शहरातील नागरिकांचा संबंध येत नाही. त्यांनी का म्हणून ओझे सहन करायचे? कर्ज काढून किती गोष्टी करायच्या? त्याची गरजही नाही. महापालिका फक्त अंमलबजावणी करणारी संस्था असल्याचा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला. शहरातील कामांच्या पाहणीसंदर्भात बोलताना ठाकरे यांनी सांगितले, रस्त्यांलगतच्या फूटपाथवर अपंग, वृद्धांना सहजपणे चढता- उतरता यावे यादृष्टीने फूटपाथची रचना केली जाणार आहे. शहरातील वाहतूक बेटांची रचनाही एकसारखीच असावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कुंभमेळा हा काही एकट्या नाशिक शहराचा विषय नाही आणि महापालिकेचीही जबाबदारी नाही
By admin | Updated: April 3, 2015 01:31 IST