प्रशासनाच्या भरवशावर कुंभमेळा नको
By Admin | Updated: July 1, 2015 23:38 IST2015-07-01T23:38:29+5:302015-07-01T23:38:47+5:30
जनतेनेही सहभागी होण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

प्रशासनाच्या भरवशावर कुंभमेळा नको
नाशिक : नाशिकचा कुंभमेळा भारतात नव्हे तर जगाचे आकर्षण ठरणार असून, एकट्या प्रशासनाच्या भरवशावर कुंभमेळा यशस्वी होणार नाही. हा कुंभ उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
जिल्हा परिषदेत कृषी दिनाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांना, तसेच शेतकऱ्यांना कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. आपल्याला जळगावचे पालकमंत्री व्हायचे होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी जळगावचे पालकमंत्री होण्याची इच्छा प्रकट केल्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्याला नाशिकचे पालकमंत्री पद दिले. नाशिकला होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन त्यासाठी पालकमंत्र्यांवर विशेष जबाबदारी आहे. कुंभमेळा यशस्वी करण्याचे आपल्यापुढे आव्हान आहे. त्यासाठी आपण कालच सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली. हा कुंभमेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून, त्यासाठी आवश्यक ते सर्वच नियोजन आपण करीत आहोत. कोट्यवधी भाविक नाशिकला येणार आहेत. त्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोेहरा विकासकामांच्या माध्यमातून बदलला आहे. रस्ते, पूल यांसह विविध कामे झाली आहेत; मात्र एकट्या प्रशासनाच्या भरवशावर कुंभमेळा यशस्वी होणार नाही. त्यासाठी हा कुंभमेळा म्हणजे आपल्या घरचे कार्य आहे, असे मानून सर्व नाशिककरांनी त्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. सर्वांचा सहभाग असला तरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन यशस्वी होणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी आपल्या गावाचे कार्य आहे, असे समजून सिंहस्थासाठी मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाला केले.