कुंभमेळा : हेलिपॅड, छावणीसाठी जागेची मागणी
By Admin | Updated: July 3, 2015 00:30 IST2015-07-03T00:29:52+5:302015-07-03T00:30:21+5:30
लष्कराकडून साधुग्रामची पाहणी

कुंभमेळा : हेलिपॅड, छावणीसाठी जागेची मागणी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यावर घोंगावणारे दहशतवादी कृत्याचे सावट व संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा तत्काळ सामना करता यावा म्हणून यंदा पहिल्यांदाच भारतीय लष्कराची मदत घेण्यात येणार असल्याने गुरुवारी दुपारी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तुकडीने साधुग्रामची पाहणी केली. साधुग्राममध्ये लष्करी तळासाठी, तर परिसरात हेलिपॅडसाठी लष्काराने जागेची मागणी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशांतील भाविक तसेच हजारोंच्या संख्येने साधू-महंत सहभागी होणार आहेत. देशपातळीवरच दहशतवाद्यांचे सावट असल्यामुळे कोट्यवधी भाविक जेथे जमणार आहेत. अशी ठिकाणे अतिरेक्यांच्या निशाण्यावर असणे स्वाभाविक असल्याचे मानून त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाची तयारी सुरू आहे. प्रमुख मार्ग, शाही मिरवणूक मार्ग, रामकुंड, तपोवन या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यामागे हाच हेतू आहे. मात्र यंदाच्या कुंभमेळ्यात पहिल्यांदाच प्रशासनाच्या तयारीत लष्कराची मदत घेण्याचे नियोजन सुरुवातीपासूनच केले गेले आहे. अत्यावश्यक बाब म्हणून लष्कराने तातडीची सोय म्हणून दोन हेलिकॉप्टर देण्याचे यापूर्वीच मान्य केले असले तरी, आता कुंभमेळा जवळ येताच, लष्कराची तुकडीदेखील साधुग्राम परिसरात तैनात ठेवण्याचे निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी साधुग्राम व परिसराची पाहणी केली. तपोवनात साकारणाऱ्या साधुग्रामच्या प्रत्येक सेक्टर निहाय पाहणी करतानाच साधुग्रामला येऊन मिळणाऱ्या रस्त्यांचीही त्यांनी माहिती घेतली. लष्कराने यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे ५०० बाय ५०० मीटर जागेची मागणी केलेली आहे. याठिकाणी लष्कराची छावणी असेल, त्याबरोबरच मेडिकल युनिट, मोबाइल युनिट व कम्युनिकेशन सेंटर अशा विविध यंत्रणांसाठी तेथे व्यवस्था केली जाणार आहे. प्रशासनाने लष्कराला साधुग्राममध्ये जागा देण्याची तयारी दर्शविली असून, तपोवन परिसरातच हेलिपॅडसाठी जागेचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)