कुंभमेळ्यात साधली ‘पर्वणी’‘

By Admin | Updated: October 10, 2015 23:24 IST2015-10-10T23:23:54+5:302015-10-10T23:24:52+5:30

राज्य अतिथींवर’ कोट्यवधींचा खर्च

Kumbh Mela celebrated 'Honeymoon' | कुंभमेळ्यात साधली ‘पर्वणी’‘

कुंभमेळ्यात साधली ‘पर्वणी’‘

नाशिक : सिंहस्थासाठी आलेल्या भाविक व साधू-महंतांच्या सुविधांसाठी अडीच हजार कोटी रुपये खर्ची पाडल्यानंतरही अजूनही खर्चाचे कवित्व सुरूच असून, कुंभमेळ्याच्या महिनाभराच्या पुण्यपर्वात नाशिक व त्र्यंबकेश्वरी भेट देणाऱ्या ‘राज्य अतिथीं’च्या सरबराईवर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा प्रश्न समोर आला आहे. राज्य सरकारचे अतिथी म्हणून मानसन्मान घेतानाच नाशिकच्या प्रसिद्ध वस्तूही भेट म्हणून जबरदस्तीने या अतिथींनी नेल्या आहेत. सरकारशी संबंधित मामला असल्यामुळे खुल्यापणाने या विषयावर शासकीय यंत्रणा बोलत नसली तरी, झालेला खर्च कसा वसूल करावा, या विवंचनेत अधिकारी आहेत.
कुंभमेळ्यात पुण्यप्राप्तीसाठी ज्याप्रमाणे साधू-महंत व लाखो भाविक येतात, त्याचप्रमाणे यंदाच्या कुंभात केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे सदस्य, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, सचिव व शेकडो सनदी अधिकाऱ्यांनीही नाशिकच्या रामकुंडात व त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तात स्रान करून पुण्य पदरात पाडून घेतले. कुंभमेळ्यात भेटीसाठी येणाऱ्यांना राजशिष्टाचाराप्रमाणे शासकीय मान-सन्मान देण्याची जबाबदारी स्थानिक शासकीय यंत्रणेवर टाकण्यात आल्याने साहजिकच त्यांची सरबराई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तलाठ्यांपर्यंत साऱ्यांनाच कामाला लावण्यात आले. मात्र हे करताना त्यासाठी येणाऱ्या खर्चाची कोणतीही तजवीज शासनाने केली नाही. उलट पाहुणे म्हणून येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांपासून ते त्यांचे वाहनचालक, स्वीय सचिव व सोबत येणाऱ्या नातेवाइकांच्याही मागेपुढे यंत्रणेला करावे लागले. त्यांच्या निवासासाठी शासकीय विश्रामगृहाचा पर्याय असला तरी, पर्वणीच्या काळात शासकीय विश्रामगृह उपलब्ध नसल्याने अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था खासगी हॉटेल्समध्ये करावी लागली. त्याचबरोबर त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ पुरविताना यंत्रणेची दमछाक उडाली. नाशिकला आले म्हणून त्र्यंबकला भेट देणे ओघाने आल्यामुळे त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करावी लागली अन् त्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या भाड्याने घ्याव्या लागल्या. काही अतिथींनी नाशिक-त्र्यंबकेश्वर नंतर सप्तशृंग देवीचे दर्शन व शिर्डीच्या साईबाबालाही सरकारी खर्चाने साकडे घालून घेतले. राज्य सरकारचे अतिथी असल्याच्या आविर्भावात काहींनी हक्काने दिमतीला असलेल्या अधिकाऱ्यांकडून नाशिकच्या प्रसिद्ध वस्तूही जबरदस्तीने मागवून सोबत नेल्या, इतपर्यंत तर काहींनी भाजीपालादेखील जाताना घरी नेल्याच्या सुरस कथा आहेत. साधारणत: महिना-दीड महिना चाललेल्या या राज्य अतिथींच्या सरबराई, भेटवस्तू, हार-तुरे, स्वागत व सत्कारावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या खर्चात यातील कोणत्याही खर्चाचा समावेश नाही. (प्रतिनिधी)

रिक्षानेही फिरल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती

रेल्वेने व खासगी वाहनांनी येणार्‍या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सरबराईसाठी शासकीय यंत्रणेला महत्प्रयास करावे लागले. रात्री-अपरात्री त्यांचे आगमन होणार असल्याने त्यांची वाट पाहत ताटकळत राहावे लागले, तर कधी कधी शासकीय वाहन वेळेत उपलब्ध न होऊ शकल्याने या महत्त्वाच्या व्यक्तींची रिक्षातून ने-आण करावी लागली, त्यासाठी स्वत:लाच पदरमोड करावी लागली.

यांनी लावली हजेरी
    कुंभमेळ्याच्या पर्वात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, जलसंसाधनमंत्री उमा भारती, आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, केंद्रीयमंत्री हंसराज अहिर, राज्यपाल विद्यासागर राव, दिल्ली विधानसभा अध्यक्ष गोयल, राज्यमंत्रिमंडळातील पंकजा मुंडे, विष्णू सावरा, दीपक सावंत, राजकुमार बडोले, राम शिंदे, दीपक केसकर, रणजित पाटील यांच्यासह राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, अन्य राज्यांचे राज्यपाल यांनी हजेरी लावली.

Web Title: Kumbh Mela celebrated 'Honeymoon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.