नाशकातही खांदेपालटाचे वारे कोतवाल, सकाळे, आव्हाड, अहेर, छाजेड चर्चेत
By Admin | Updated: March 4, 2015 00:56 IST2015-03-04T00:56:16+5:302015-03-04T00:56:39+5:30
नाशकातही खांदेपालटाचे वारे कोतवाल, सकाळे, आव्हाड, अहेर, छाजेड चर्चेत

नाशकातही खांदेपालटाचे वारे कोतवाल, सकाळे, आव्हाड, अहेर, छाजेड चर्चेत
नाशिक : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या जागी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची वर्णी लागताच नाशिक शहर व जिल्हा कॉँग्रेसमध्येही बदलाचे वारे वाहू लागले असून, जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह सुनील आव्हाड, यशवंत पाटील आदिंची नावे चर्चेत आली आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांचा तीन वेळा जिल्हाध्यक्ष होण्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने कॉँग्रेसच्या घटनेनुसार त्यांना आता जिल्हाध्यक्ष पदावर राहता येण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच पानगव्हाणे यांच्या विरोधात महिन्याभरापूर्वीच एका विरोधी गटाने मोहीम सुरू केली होती. तसेच तत्कालीन संपर्कमंत्री व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची संगमनेरला जाऊन भेट घेत याबाबत चर्चा केली होती. आता प्रदेशाध्यक्ष पदात खांदेपालट झाल्यामुळे साहजिकच नाशिक जिल्हा व शहर कॉँग्रेस कार्यकारिणीतही बदलाचे वारे पुन्हा वाहू लागले आहे. शहराध्यक्षपदी असलेल्या अश्विनी बोरस्ते यांनी गटबाजीला कंटाळून पदाचा राजीनामा दिल्यापासून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रभारी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी युवक कॉँग्रेसचे माजी पदाधिकारी शरद अहेर यांच्याकडे प्रभारी पदाचा पदभार सोपविला होता. तेव्हापासून शरद अहेर हे प्रभारी शहराध्यक्ष म्हणूनच नियमितपणे कामकाज पाहत आहेत. आता प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आल्याने जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी आपापल्या परीने जिल्हाध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.